अनुदानावर बियाणे, तणनाशक उपलब्ध करून देण्याची गरज
By admin | Published: June 2, 2015 01:23 AM2015-06-02T01:23:10+5:302015-06-02T01:23:10+5:30
विदर्भातील आपत्तीग्रस्त शेतक-यांचा सूर.
अकोला : टंचाईग्रस्त विदर्भातील शेतकर्यांचे अद्यापि पीक कर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने अनेक शेतकर्यांना नवे पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यावर्षी खते, बियाणे खरेदी करताना शेतकर्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने बियाणे व सोयाबीन पिकासाठी आवश्यक असलेले तणनाशक शेतकर्यांना अनुदानावर उपलब्ध करू न देण्यात यावे, असा सूर शेतकरी वर्गातून उमटत आहे.
पावसाचा फटका बसल्याने शेतकर्यांना या अगोदर रब्बी व खरीप हंगामातील बियाणे अनुदानावर उपलब्ध करू न देण्यात आले होते. यामध्ये सोयाबीन बियाण्याचाही समावेश होता. यावर्षी भीषण स्थिती असून, शेतकर्यांकडे बियाणे खरेदीसाठीही पैसा नसल्याने शासनाने बियाणे, तणनाशके, खते अनुदानावर द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
गतवर्षी तणनाशक शेतकर्यांना वाटप करण्याचा निर्णय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने घेतला होता. हे तणनाशक शासकीय अनुदानावर उपलब्ध करू न दिले होते. यंदाही बियाणे, खते व तणनाशक उपलब्ध करू न द्यावे, अशी मागणी होत आहे.