विकाररहित समाजाच्या निर्मितीसाठी सत्संगाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:25 AM2021-09-16T04:25:21+5:302021-09-16T04:25:21+5:30
अकोला : तपोनिधी श्री पंचायत आनंद आखाड्याचे प्रमुख पीठाधीश्वर, आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांचे आज अकोल्यातील आगमनानिमित्त ...
अकोला : तपोनिधी श्री पंचायत आनंद आखाड्याचे प्रमुख पीठाधीश्वर, आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांचे आज अकोल्यातील आगमनानिमित्त श्रीराम नवमी शोभायात्रा समिती, श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समिती तसेच श्री रामदेव बाबा व श्री श्याम बाबा मंदिर ट्रस्टतर्फे स्वागत करण्यात आले. आज प्रत्येकच व्यक्ती तणावात वावरत असून निरोगी व विकारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अध्यात्म व सत्संगाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी स्वामीजींनी केले.
गीता नगरातील श्री रामदेवबाबा व श्री श्यामबाबा मंदिर प्रांगणात आयोजित दर्शन व सत्संग सोहळ्यात समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते तसेच महापौर अर्चना मसने यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी बालकानंद गिरी महाराज यांचे पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या सत्संगात स्वामी बालकानंद गिरी यांनी प्रत्येक व्यक्तीत ईश्वराचा वास असल्याचे सांगून, त्यालाच निरोगी राखण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे मार्गदर्शन केले. त्यासाठी आपल्या आश्रमातर्फे १०८ बालकांच्या मोफत वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून विविध उदाहरणांसह त्यांनी धर्म व संस्काराचे महत्त्व यावेळी पटवून दिले.
प्रारंभी लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविक व स्वामीजींचा परिचय करून दिला. आमदार शर्मा यांनी स्वामीजींच्या दर्शनाचा योग लाभल्याबद्दल गौरवोद्गार काढले. मंदिर ट्रस्टचे प्रमुख रमेश टेकडीवाल, कमलबाबू अग्रवाल, उपमहापौर राजेंद्र गिरी, रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष विलास अनासने, किशोर पाटील, कैलाश मामाजी अग्रवाल, निरंजन अग्रवाल, ॲड. देवाशीष काकड, रामावतार अग्रवाल, ओमप्रकाश गोयंका, डॉ. सत्यनारायण खोरिया, महेंद्र खेतान, अनिल मानधने, गिरीराज तिवारी, पुष्पा वानखेडे, मनीषा भुसारी, जयश्री दुबे, गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे आदी मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमी शोभायात्रा समितीचे सचिव गिरीश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. राजू बालाजी शर्मा यांनी आभार मानले.
सालासर मंदिरासही भेट...
स्वामी बालकानंद गिरी यांनी सायंकाळी श्री सालासर बालाजी मंदिरासही भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर सेवा समिती ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. अकोल्यातील मंदिरांची भव्यता व भाविकांची श्रद्धा धर्म कार्याला प्रोत्साहनदायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.