उपासमार टाळण्यासाठी नवीन धोरणाची गरज
By admin | Published: December 5, 2014 12:00 AM2014-12-05T00:00:41+5:302014-12-05T00:00:41+5:30
जागतिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस यांचे प्रतिपादन; आंतराष्ट्रीय महिला परिसंवादाचे अकोल्यात उद्घाटन.
अकोला : जगात शेतीचे क्षेत्र कमी, पण उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे अनेक देशात नागरिकांना खायला अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याचे वास्तव आहे. यामागील कारणे शोधून, प्रत्येकाला अन्न कसे मिळेल, यासाठीचे नवे धोरण सरकारी यंत्रणांनी आखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल तथा जागतिक शेतकरी संस्थेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस (ऑस्ट्रेलिया) यांनी गुरुवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ४ ते ७ डिसेंबरदरम्यान आंतराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे उद्घाटन आंतराष्ट्रीय महिला शेतकरी प्रतिनिधी जुलियाना स्वै (टांझानिया) आणि ग्रामपरी संस्थेच्या कार्यकारी संचालक जयश्री राव यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, नागपूरस्थित नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनचे सचिव जीम व्हिगन (ग्रेट ब्रिटन), इनिशिएटिव्ह ऑफ चेंज या संस्थेचे रवींद्र राव (पाचगणी), रतन टाटा ट्रस्टचे अभितांशु चौधरी, डॉ. पी. जी. इंगोले, आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अन्नधान्याचे उत्पादन वाढत असताना, शेतकर्यांच्या उत्पादित मालाला पूरक भाव मिळण्याची गरज फिल जेफ्रिस यांनी अधोरेखित केली. त्यादृष्टीने बाजारपेठेची व्यवस्था असली पाहिजे. आपण भरघोस उत्पादनाच्या दिशेने धावत असलो तरी मानवी आरोग्यावर घातक परिणाम करणारी कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर शेतीत कमी करण्याची नितांत गरज आहे; किंबहुना शाश्वत शेतीच यापुढे तारणार असल्याचे ते म्हणाले. या परिसंवादाच्या माध्यमातून जागतिक शेती अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सततची नापिकी, बाजारभावातील तफावत, तसेच वारंवार उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना जगाचा पोशिंदा जेरीस आला आहे. असे परिसंवाद शेतकर्यांना दिशादर्शक ठरावेत, त्यातून नवे मार्ग निघावेत, असा आशावाद खासदार धोत्रे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. दाणी यांनी शेतीमधील महिलांचा निर्णायक सहभाग वाढविल्याशिवाय व पूरक व्यवसायाची कास धरल्याशिवाय शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध होणार नाही, असे सांगून परिसंवादाच्या माध्यमातून ठोस शिफारशी निघाव्यात, जेणेकरू न विदर्भातील शेतकर्यांना लाभ घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय परिसंवादाला विदर्भासह राज्यातील महिला-पुरुष शेतकरी, तज्ज्ञांसह ११ देशांतील शेतकरी उपस्थित आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मोहिनी डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे यांनी केले. उद्घाटन सोहळय़ानंतर चर्चासत्राला प्रारंभ करण्यात आला. १0 डिसेंबरपर्यंत चालणार्या या परिसंवादात शेतीशी निगडित विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे.