‘निगेटिव्ह’ रुग्ण दाखविला ‘पॉझिटिव्ह’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:25 AM2021-02-27T04:25:19+5:302021-02-27T04:25:19+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : पारद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या मुख्याध्यापकाने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करुन घेतली ...
संजय उमक
मूर्तिजापूर : पारद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या मुख्याध्यापकाने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करुन घेतली असता त्यांचे नाव पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत आले. त्यानंतर त्यांनी अहवाल मागितला असता तो निगेटिव्ह असल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सिरसो येथील ग्रामसेवक कॉलनीत राहणारे छत्रपती वाकोडे यांनी १८ फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणी केली. यामध्ये दि. २० फेब्रुवारी रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे हेंडज येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे लागणार असल्याचे पारद प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने वाकोडे यांना सांगितले. त्यानंतर वाकोडे हे विलगीकरण कक्षात दाखल होण्यासाठी गेले व तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कराळे यांना अहवाल मागितला, परंतू त्यांच्याकडे रिपोर्ट कार्ड नसल्याने अहवाल मिळावा, अशी मागणी वाकोडे यांनी आरोग्य अधिकाऱ्याकडे केली. गत सात दिवसांनंतर त्यांच्या हातात निगेटिव्ह अहवाल ठेवण्यात आल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. हा प्रकार बनवाबनवीचा असून, माझ्या परीवाराला जाणीवपूर्वक वेठीस धरले आहे. यामुळे मला सात दिवस मानसिक त्रास सहन करावा लागला. या गंभीर प्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी छत्रपती वाकोडे यांनी केली आहे.
---------------------------------------
छत्रपती वाकोडे यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असून, चुकून त्यांचे नाव पॉझिटिव्ह यादित आले आहे. त्यांना सहकार्याची भूमिका ठेवून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
-डॉ. सुधीर कराळे, तालुका आरोग्य अधिकारी, मूर्तिजापूर