मनपाकडून अनुकंपाधारकांची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:45+5:302021-04-24T04:18:45+5:30
प्रभाग २ मध्ये रस्त्यांची दुरवस्था अकाेला : अकाेटफैल भागातील प्रभाग क्रमांक २ मध्ये परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ...
प्रभाग २ मध्ये रस्त्यांची दुरवस्था
अकाेला : अकाेटफैल भागातील प्रभाग क्रमांक २ मध्ये परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवकांप्रती रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या समस्यांची दखल घेत मनपा प्रशासनाने दलित वस्ती सुधार याेजनेतून रस्त्याचे नियाेजन करण्याची मागणी समाेर आली आहे़
जलकुंभ परिसरात साचले पाणी
अकाेला : जुन्या शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
उड्डाणपुलाखाली सांडपाण्याची समस्या
अकाेला : शहरात खदान पाेलीस ठाणे ते रेल्वेस्टेशन राेडपर्यंतच्या निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पावसाचे पाणी व रस्त्यालगतच्या दाेन्ही बाजूंच्या दुकानांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केले जात आहे; परंतु नाल्यांचे बांधकाम नियमानुसार हाेत नसल्याने भविष्यातही सांडपाण्याची समस्या कायम राहणार असल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी घेतला आहे.
जलवाहिनीसाठी रस्त्यालगत खाेदकाम
अकाेला : जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी गुरुवारी जुने शहरातील डाबकी राेड पाेलीस ठाण्यासमाेर मुख्य रस्त्यालगत खाेदकाम करण्यात आले़; परंतु रस्त्यावर माेठ्या प्रमाणात माती साचली असून, या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता ही माती तातडीने हटविण्याची गरज निर्माण झाली आहे़ यापूर्वीदेखील कंत्राटदाराने खाेदलेल्या रस्त्याची विलंबाने दुरुस्ती केली हाेती.
आंबेडकर मैदानालगत नाला तुंबला
अकाेला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या डाबकी राेड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगत एसबीआय शाखा आहे. या ठिकाणचा मुख्य नाला घाणीने तुडुंब साचला आहे़ साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नाल्याच्या साफसफाइकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे़
प्रभाग ७ मध्ये जलवाहिनीचे काम खाेळंबले
अकाेला : महापालिका प्रशासनाने ‘अमृत’अभियानांतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अँड जीपी’नामक एजन्सीला दिला आहे. कंत्राटदाराने लक्कडगंज भागातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये जलवाहिनीचे अर्धवट जाळे टाकले असून, त्यापुढील काम बंद केले आहे. यामुळे जलवाहिनी असूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने कानाडाेळा केल्याचे दिसत आहे़
भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य
अकाेला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या शिवचरण पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैक परिसरात भाजीपाला विक्री केली जाते. भाजीपाला व फळ विक्री केल्यानंतर सदर व्यावसायिक सडका भाजीपाला रस्त्यालगत उघड्यावर फेकून देत असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकाचे दुर्लक्ष हाेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.