ना सावली ना पाणी, उन्हातच बियाण्याची विक्री; शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा
By संतोष येलकर | Published: May 26, 2024 05:02 PM2024-05-26T17:02:02+5:302024-05-26T17:02:20+5:30
बीटी कपाशीच्या एका वाणासाठी केंद्रांवर लागल्या शेतकऱ्यांच्या रांगा
अकोला: मागणीच्या तुलनेत बीटी कपाशीच्या एका वाणाचा पुरवठा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर या वाणाच्या बियाण्यासाठी रविवारी शहरातील बियाणे विक्री केंद्रांवर भर उन्हातच शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. तापत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका असताना सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता उन्हातच शेतकऱ्यांना संबंधित वाणाच्या बियाण्याची विक्री करण्यात आली.
उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता, जिल्हयात येत्या ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी २५ मे रोजी दिला. परंतू शहरातील बियाणे विक्री केंद्रांच्या परिसरात उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली, पिण्याचे पाणी आदी उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे २६ मे रोजी अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हातच दुपारपर्यंत बियाणे विक्री केंद्रांसमोर रांगेत उभे राहून शेतकऱ्यांना संबंधित वाणाच्या बियाण्याची खरेदी करावी लागल्याचे दिसत होते.
रांगेतील शेतकऱ्यांना कुपन देवून प्रत्येकी तीन पाकीटे बियाण्याची विक्री !
बीटी कपाशीच्या एका विशिष्ट वाणाचे बियाणे खरेदी करण्यासाठी रविवारी अकोला शहरातील बियाणे विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. रांगेतील शेतकऱ्यांना कुपन देवून संबंधित वाणाच्या प्रत्येकी तीन पाकीटे बियाण्याची विक्री करण्यात आली. शनिवारपर्यत जिल्हयात शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन पाकीटे बियाण्याची विक्री करण्यात येत होती. रविवारपासून संबंधित वाणाच्या तीन पाकीटे बियाण्याची विक्री सुरु करण्यात आली. अशी माहिती कृषी विकास अधिकारी मिलींद जंजाळ यांनी दिली.
पहिल्याच दिवशी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा!
उष्माघाताचा धोका लक्षात घेता, कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दिला.मात्र बियाणे खरेदीसाठी शहरातील बियाणे विक्री केंद्रांच्या परिसरात रविवारी भर उन्हात शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागल्याने, पहिल्याच दिवशी प्रतिबंधात्मक उपायोजनांकडे कानाडोळा करण्यात आल्याचे चित्र दिसत होते.
बियाणे निरीक्षक, पोलीस बंदोबस्तात विक्री !
बीटी कपाशी संबंधित वाणाच्या अकोला शहरातील पाच विक्रेत्यांकडे कृषी विभागाचे पाच बियाणे निरीक्षक, महसूल विभागाच्या पाच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोस्तात बियाण्याची विक्री करण्यात आली.