नेरधामणा बॅरेजला अद्याप वीजपुरवठाच नाही; वक्रद्वार लावणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:37 PM2019-08-07T14:37:45+5:302019-08-07T14:37:55+5:30
येथे वीजपुरवठा पोहोेचला नसल्याने वक्रद्वार लावण्याचे काम लांबण्याची शक्यता आहे.
अकोला: नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेजचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, बॅरेजला वक्रद्वार लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु येथे वीजपुरवठा पोहोेचला नसल्याने वक्रद्वार लावण्याचे काम लांबण्याची शक्यता आहे.
खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना गोड पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पूर्णा खोºयातील काळ्या मातीवर हे पहिले बॅरेज होत असून, त्यासाठी आधुनिक डॉयफाम वॉल प्रणाली वापरण्यात आली. आजमितीस बॅरेजचे ९० टक्के काम पूर्ण झाले. २०१७ मध्ये बॅरेजचे बांधकाम पूर्ण होणार होते; पण अद्याप वक्रद्वार लावण्यात आले नाहीत, त्यामुळे बॅरेजमध्ये पाणी अडवता आले नाही. २०१९ मध्येही हे काम अपूर्णच आहे. २००६-०७ पासून येथे बॅरेजचा प्रस्ताव होता. तथापि, २००९ -१० मध्ये प्रत्यक्ष बॅरेजच्या कामाला सुरुवात झाली होती. २०१२ पर्यंत बॅरेजचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले होते. अनेक अडथळ््यांची शर्यत पार करीत आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाले. येत्या सप्टेबर महिन्यात बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचे नियोजन करण्यात आले; परंतु त्यासाठी येथे वीज उपकेंद्राची गरज आहे; परंतु अद्याप वीजपुरवठा पोहोचला नसल्याने हे काम केव्हा होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.