‘जीएमसी’त नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:10 PM2019-07-26T14:10:15+5:302019-07-26T14:11:20+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत दोन दिवसांपासून ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने आॅनलाइन कामांचा गोंधळ सुरू आहे.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत दोन दिवसांपासून ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने आॅनलाइन कामांचा गोंधळ सुरू आहे. सर्व्हर डाउनचा फटका दिव्यांगांसह जीवनदायी योजनेच्या लाभार्थींना बसत आहे.
इतर विभागांसह वैद्यकीय विभागातही बहुतांश कामे पेपरलेस झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग प्रमाणपत्र आणि रुग्णांसाठी असलेल्या विविध योजनांचा समावेश आहे. शिवाय, रुग्ण व त्यांच्या उपचाराची संपूर्ण अद्ययावत माहितीदेखील आॅनलाइनच अपडेट केली जात असून, रुग्णालयातील आवश्यक माहिती आरोग्य विभागाकडे आॅनलाइनच पाठविली जाते; मात्र शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ही सर्व आॅनलाइन कामे गत दोन दिवसांपासून ठप्प झाली आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णांना मिळणाऱ्या विविध आरोग्य सेवांवर पडत आहे. आॅनलाइन कामे ठप्प पडल्याने रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
या ठिकाणी कामकाज प्रभावित
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय
दिव्यांग कक्ष
जीवनदायी योजना कक्ष
औषध भंडार
अधिष्ठाता कक्ष
लेखापाल विभाग
रुग्ण व नातेवाइकांना हेलपाटे
इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या येत असल्याने आॅनलाइन अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जीवनदायी योजनेचा आॅनलाइन अर्ज असो वा दिव्यांग कक्षात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज दोन्ही ठिकाणी समस्या येत असल्याने दिव्यांगांसह इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत.
मागील दोन दिवसांपासून सर्व्हरची समस्या सुरू आहे. त्यामुळे आॅनलाइन कामकाजाची गती मंदावली आहे. यासंदर्भात हालचाली सुरू असून, लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.