हनुमान रथयात्रा बनणार अकोल्याची नवी सांस्कृतिक परंपरा
By admin | Published: April 6, 2017 02:28 PM2017-04-06T14:28:42+5:302017-04-06T14:28:42+5:30
हनुमान जयंतीनिमित्त अकोला शहरात जगन्नाथ पुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या धर्तीवर हनुमंताची विराट शोभायात्र काढण्यात येणार.
हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन : आयोजन समितीची जय्यत तयारी
अकोला : येणार्या ११ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अकोला शहरात जगन्नाथ पुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या धर्तीवर हनुमंताची विराट शोभायात्र काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली. राजराजेश्वर नगरी अशी ओळख असलेल्या अकोला शहरात सर्वच सण-उत्सव, धार्मिक सोहळे मोठय़ा उत्साहाने पार पाडले जातात. याच परपंरेत या वर्षापासून श्रीराम भक्त हनुमान जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्याचा भर पडणार आहे. या निमित्त शहरात एक भव्य व आगळी-वेगळी शोभायात्रा काढण्यात यावी, असा विचार घेऊन श्हरातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्याचे ठरविले आहे. या संदर्भात जुने शहरातील काळा मारोती संस्थान, पंचमुखी हनुमान मंदीर, गोडबोल प्लॉट येथील हनुमान मंदिर, शास्त्री नगर, मोठी उमरी, देशमुख पेठ या परिसरात हनुमान भक्तांच्या बैठका होऊन शोभायात्रा काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवार, ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता राजराजेश्वर मंदिर परिसरातून या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. जयहिंद चौक, काळा मारोती, मोठा दगडी पुल, सिटी कोतवाली चौक, राममंदिर, जुने कापड बाजार, गांधी चौक अशी मार्गक्रमणा करीत ही शोभायात्रा सिटी कोतवाली चौकात येणार आहे. तेथे हनुमान मंदिरात महाआरती होऊन राममंदिर परिसरात शोभायात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला काँग्रेस महानगरअध्यक्ष बबनराव चौधरी, कृष्णा अंधारे, अश्विन पांडे, अविनाश देशमुख, पवन पाडीया, कपील रावदेव, अरुंधती शिरसाट, पंकज साबळे, उषा विरक, रमाकांत खेतान, सुषमा निचळ, महेश गणगणे, बालमुकुंद भिरड, संतोष तीवारी, मामा अग्रवाल आदींची उपस्थिती होती.