महावितरणच्या नावे बनावट एसएमएस पाठवून फसवणुकीचा नवा फंडा
By Atul.jaiswal | Published: August 8, 2023 06:22 PM2023-08-08T18:22:40+5:302023-08-08T18:23:25+5:30
वैयक्तिक क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका : महावितरणचा सावधानतेचा इशारा
अतुल जयस्वाल, अकोला : वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे.
वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. गेल्या काही महिन्यांत नागरिकांना असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे एसएमएस आणि व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट आले आहे.
सेंडर आयडी एमएसईडीसीएल
महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टिमद्वारे विविध माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येते. त्याचा सेंडर आयडी हा एमएसईडीसीएल असा आहे. तसेच, या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळवले जात नाही.
वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठवल्या जाणाऱ्या बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. तसेच, मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. - दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, अकोला परिमंडळ, महावितरण