नवी पिढी बिघडलेली नाही, भरकटली- अण्णासाहेब मोरे
By Admin | Published: March 7, 2017 02:12 AM2017-03-07T02:12:10+5:302017-03-07T02:12:10+5:30
श्री सर्मथ पब्लिक स्कूलचा शिलान्यास संपन्न; हजारो सेवेकरी उपस्थित.
अकोला, दि. ६- आजच्या घडीला प्रत्येकाला आपल्या पाल्यांची काळजी लागली आहे. मुले अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक आकर्षित होत आहेत. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना नवीन पिढी बिघडत असल्याची काळजी सतावतेय; त्यांना योग्य मार्ग आपणच दाखवू शकतो. त्यानंतर शिक्षकांचे कार्य सुरू होते, असे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी सर्मथ बाल संस्कार केंद्राचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले.
शिक्षण क्षेत्रात गेल्या २0 वर्षांपासून यशस्वीरीत्या कार्य करणार्या अकोल्यातील श्री सर्मथ शिक्षण समूहाच्या श्री सर्मथ पब्लिक स्कूलची भव्य वास्तू राष्ट्रीय महामार्ग सहावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ साकारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन व शिलान्यास सोहळा सोमवार, ६ मार्च रोजी सायं. ४ वाजता दिंडोरीप्रणित श्री स्वामी सर्मथ केंद्राचे सद्गुरू अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी समूहाचे संस्थापक प्रा. नितीन बाठे व श्री सर्मथ एज्युकेशन परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते. समारंभादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णासाहेब म्हणाले की, पालकांनी पाच ते आठ वर्षे वयोगटातील बालकांना जीवनाचे मौलिक शिक्षण द्यायला हवे. यामुळे नातेवाईक, शेजारी व शिक्षकवृंदांसोबत कसे वर्तन ठेवायचे, याचे ज्ञान मुलांना बालवयातच होईल. जीवनातील पाच गुरूंचे महत्त्व यावेळी अण्णासाहेबांनी विशद केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरू हा त्याचे आई-वडील असतात. बालकांना सुसंस्कारित करण्याचे कार्य माता-पिता करीत असतात. प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक हे दुसरे गुरू. तिसरे गुरू हे उच्च शिक्षण प्रदान करणारे शिक्षक आहेत, तर चौथे गुरू रोजगार प्राप्त करण्यासाठी सहाय्य करतात.
गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात पाचवा गुरू असणे गरजेचे आहे. अनंत अडचणींचा सामना करीत पाचव्या गुरूच्या प्राप्तीनंतर मनुष्याला मन:शांती व आत्मिक समाधानाची अनुभूती होते. श्री राजराजेश्वर नगरीत तीन श्री स्वामी केंद्रे स्थापित झाली आहेत. संस्कृतीच्या व राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी अभ्यासक, उपासक, प्रचारक आणि प्रसारक होण्याचे आवाहन गुरुमाउलींनी यावेळी केले.