नवीन मोटर वाहन कायद्याचे अद्याप परिपत्रक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 02:03 PM2019-09-03T14:03:07+5:302019-09-03T14:03:11+5:30
राज्य शासनाने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रकच पाठविले नाही.
अकोला: केंद्र सरकारच्या नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक अद्याप अकोला पोलिसांना प्राप्त झाले नसल्याची माहिती असून, त्यामुळे सोमवारीदेखील अकोल्यात नवीन मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक किंवा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
नवा मोटर वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर १ सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सिट बेल्टचे नियम न पाळणे यासाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. मोक्यावरच ई-चालान ठोकण्यासाठी मशिन्स अद्ययावत करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अनेक वर्षानंतर मोटर वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडाची रक्कम मोठी वाटणे स्वाभाविक आहे. अशात वाहतूक पोलिसांसोबत सल्लामसलत करून दंडासंदर्भात नवी अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे; मात्र राज्य शासनाकडून अद्याप तरी नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रक आले नसल्याची माहिती अकोला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातही अंमलबजावणी नाहीच!
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रक राज्य शासनाला केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे; मात्र राज्य शासनाने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रकच पाठविले नाही. त्यामुळे सध्या तरी राज्यातील जिल्ह्यात जुन्याच मोटर वाहन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात येत आहे.