नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे काम रखडले!

By admin | Published: February 5, 2017 02:06 AM2017-02-05T02:06:28+5:302017-02-05T02:06:28+5:30

शासनाने मंजुरी दिली; पण महाविद्यालयासाठी अद्याप जागाच नाही; कृषी मंत्री लक्ष देतील का?

New Veterinary Degree College | नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे काम रखडले!

नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे काम रखडले!

Next

राजरत्न सिरसाट
अकोला, दि. ५- विदर्भातील विद्यार्थ्यांंच्या सोयीसाठी शासनाने अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे; पण महाविद्यालयासाठी लागणारी जागाच अद्याप मिळाली नसल्याने, नवीन पदवी महाविद्यालयाचे काम रखडले आहे. त्यामुळे पश्‍चिम विदर्भातील विद्यार्थ्यांंना नागपूर, पुण्याला प्रवेश घ्यावा लागला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांंकडून केला जात आहे.
अकोला व जळगावला राज्य शासनाने पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. महाविद्यालयाची इमारत, प्रयोगशाळेसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला दहा कोटी रुपये निधी दिला आहे. वर्‍हाडातील अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्या दृष्टीने मागील अर्थसंकल्पात हा विचार करू न विद्यार्थ्यांंना प्रवेश घेण्यासाठी अकोला व जळगाव खान्देश येथे महाविद्यालय मंजूर केले आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेली स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था पशुविज्ञान विद्यापीठाला जोडण्यात आली. या संस्थेत केवळ पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते. अकोल्याच्या पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेत पदव्युत्तर शिक्षणासह पीएचडी करायची असेल, तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे; परंतु नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सोडले, तर विदर्भात दुसरे पदवी महाविद्यालयच नव्हते. याच पृष्ठभूमीवर येथील स्नातकोत्तर संस्थेला पदवी महाविद्यालय देण्यात आले आहे.
व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार, महाविद्यालयाला जागा हवी आहे. अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंंतचा अभ्यासक्रम आहे. बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता राहणार असल्याने स्वतंत्र महाविद्यालयासाठी जागा हवी आहे. पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांंचा असल्याने ३00 विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२0 विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५00 विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. त्यांच्याकरिता सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व वसतिगृहाची गरज भासणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने जागेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे; परंतु अद्याप जागेचा प्रश्न सुटला नसल्याने, यावर्षी तरी विद्यार्थ्यांंना येथे प्रवेश मिळणे कठीणच आहे.

- पदवी महाविद्यालयासाठी शासनाने निधी दिला आहे. जागेसाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे; परंतु अद्याप जागेसाठीची मंजुरी मिळाली नाही; पण लवकरच मिळेल आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
- डॉ. आदित्यकुमार मिश्रा,
कुलगुरू ,महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

Web Title: New Veterinary Degree College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.