नवीन वर्षात जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रांत पोस्ट बँकेची घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:20 PM2018-12-14T13:20:12+5:302018-12-14T13:21:03+5:30
अकोला : अकोला जिल्ह्याने पोस्ट बँकेने पाच हजार खातेदार जोडण्याचा विक्रम केला असून, येत्या नवीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रात पोस्ट बँकेची घरपोच सेवा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अकोला : अकोला जिल्ह्याने पोस्ट बँकेने पाच हजार खातेदार जोडण्याचा विक्रम केला असून, येत्या नवीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रात पोस्ट बँकेची घरपोच सेवा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोस्ट बँक सेवा ३१ डिसेंबरच्या आत अपडेट करण्याचे निर्देश देशभरात दिले असून, त्याची तयारी प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे.
१ सप्टेंबर २०१८ पासून देशभरात पोस्ट बँक सेवा अस्तित्वात आली. देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून पोस्ट बँक समोर येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता; मात्र क्यूआर कार्ड आणि मोबाइल अॅपमुळे पोस्ट बँकेच्या प्रगतीचा आलेख रेंगाळला. अकोला-वाशिम पोस्ट बँकेच्या अधिकाऱ्यांनी विविध महाविद्यालयांत जनजागृती शिबिर घेतले. सोबतच जिल्हा परिषद आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या बैठका बोलावून आशाताई आणि जननी सुरक्षा योजनांसाठी पोस्ट बँक कशी महत्त्वाची आहे, हे सांगितले. अकोल्यातील विविध पोस्ट अधिकाºयांना बायोमेट्रिक मशीन देऊन खातेदार बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्हा पाच हजार खातेदारांचा आकडा पार करू शकला आहे. दरम्यान, देशभरातील पोस्ट बँका ३१ डिसेंबरपर्यंत अपडेट करण्याचे निर्देश दिले गेले असल्याने आता ही मोहीम अधिक गतिशील झाली आहे.
घरपोच सेवेचा टोल फ्री क्रमांक १५५२९९
डिसेंबरच्या आत देशभरातील सर्व पोस्ट बँका अपडेट होणार असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच घरपोच सेवा सुरू होणार आहे. पोस्ट बँकेत उलाढाल करण्यासाठी खातेदार असलेल्या ग्राहकास या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी नाममात्र सेवा शुल्कही आकारले जाणार आहे. या सेवेसाठी क्यूआर कार्ड, पासवर्ड आणि मोबाइल अॅपवर येणारे ओटीपी यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ग्राहकाची नोंद घेत ही सेवा थेट दिल्लीहून लोकेशन ट्रेसकरिता दिली जाणार आहे. आॅनलाइन कनेक्टिव्हिटीच्या समस्येत ही सेवा कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.