नवनियुक्त आयुक्त म्हणाल्या, जनावरे रस्त्यावर कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:31+5:302021-02-09T04:21:31+5:30
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या निमा अराेरा यांनी पहिल्याच दिवशी शहरातील काही समस्यांचा बारकाईने अभ्यास केल्याचे समाेर आले आहे. अव्वाच्या ...
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या निमा अराेरा यांनी पहिल्याच दिवशी शहरातील काही समस्यांचा बारकाईने अभ्यास केल्याचे समाेर आले आहे. अव्वाच्या सव्वा दराने लागू करण्यात आलेला मालमत्ता कर जमा करण्याच्या माेबदल्यात मनपा प्रशासनाने माफक मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अकाेलेकरांची रास्त मागणी आहे. अकाेलकेरांच्या मागणीला केराची टाेपली दाखवल्या जात असल्याची परिस्थिती आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेत व गल्लीबाेळात माेकाट जनावरे व डुकरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा प्रयत्न केल्यास चक्क लाेकप्रतिनिधी, नगरसेवकांकडून दबावतंत्राचा वापर केला जाताे. साेमवारी शहरात प्रवेश करणाऱ्या मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या ही समस्या लक्षात आली. विभागप्रमुखांसाेबत संवाद साधताना या समस्येला आळा घालण्यासाठी उपाययाेजना करण्याचे निर्देश आयुक्त अराेरा यांनी दिले.
भ्रष्टाचार खपवून घेणार नाही!
प्रशासकीय कामकाज करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काेणाच्याही दबावाला बळी पडू नये असे सांगत यापुढे महापालिकेत भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचा गर्भित इशारा आयुक्त निमा अराेरा यांनी दिला. या इशाऱ्याची चर्चा कर्मचाऱ्यांपेक्षा नगरसेवकांमध्येच हाेत असल्याची माहिती आहे.
दिशाभूल करणारे अधिकारी सरसावले
मनपाच्या काही विभागात नकारात्मक वृत्तीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काेणत्याही कामाची सूचना केल्यास काम निकाली न काढता वरिष्ठांची पध्दतशीरपणे दिशाभूल करण्यात संबंधितांचा हातखंडा आहे. असे अधिकारी व कर्मचारी निमा अराेरा यांची मर्जी संपादन करण्यासाठी सरसावले आहेत.