आरोग्य विभागाच्या पद भरतीपासून मुकणार नव्याने इच्छुक उमेदवार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 10:21 AM2021-01-21T10:21:11+5:302021-01-21T10:23:55+5:30
Health department Recrtment फेब्रुवारी २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज करणारे उमेदवारच पात्र ठरणार असल्याने नव्याने इच्छुक उमेदवार या पद भरतीपासून मुकणार आहेत.
अकोला : कोरोना काळात आरोग्य विभागावरील वाढता ताण आणि निर्माण झालेली बेरोजगारी, यामुळे अनेकजण आरोग्य विभागाच्या पद भरतीच्या प्रतीक्षेत होते. १८ जानेवारी रोजी आरोग्य विभागाच्या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र यासाठी फेब्रुवारी २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज करणारे उमेदवारच पात्र ठरणार असल्याने नव्याने इच्छुक उमेदवार या पद भरतीपासून मुकणार आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची निराशा झाली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती. दरम्यान, महापोर्टल रद्द झाल्याने ही परीक्षा प्रक्रिया मध्येच रखडली होती. मध्यंतरी कोरोनामुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढल्याने रिक्त पद भरतीची मागणी वाढू लागली. आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांपैकी ५० टक्के पद भरतीस मान्यता दिली. या पद भरतीपासून अनेक बेरोजगारांना अपेक्षा होत्या. त्यानुसार ते परीक्षेच्या तयारीलाही लागले. १८ जानेवारी रोजी आरोग्य विभागाच्या पद भरतीची जाहिरात निघाली अन् अनेकांचा हिरमोड झाला. या पद भरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे प्राप्त अर्जानुसार पात्र उमेदवारांनाच परीक्षेसाठी पात्र धरण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा आल्याचे दिसून येत आहे.
एसईबीसी उमेदवारांसाठी दोन पर्याय खुले
सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षण राबविण्यास अंतरिम स्थगिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आरक्षणातील उमेदवारास अनुज्ञेयानुसार आर्थिक मागास प्रवर्ग किंवा खुला प्रवर्गाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे.
आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण पाहता, ही पदभरती तातडीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण न होऊ शकलेल्या पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, प्रभारी आरोग्य उपसंचालक, अकोला