‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा बुधवारपासून बेमुदत ‘कामबंद’चा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 06:47 PM2018-04-09T18:47:47+5:302018-04-09T18:47:47+5:30
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच पुनर्नियुक्ती प्रक्रियेतील बदलाचा निषेध करण्यासाठी बुधवार, ११ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच पुनर्नियुक्ती प्रक्रियेतील बदलाचा निषेध करण्यासाठी बुधवार, ११ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या अकोला शाखेने सोमवारी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले.
आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने बुधवार, ११ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समोर सकाळी १०.३० ते ५.३० या वेळेत धरणे देत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.