‘एनएचएम’ कर्मचार्यांना मिळणार विम्याचे कवच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:03 AM2017-08-14T02:03:23+5:302017-08-14T02:04:16+5:30
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचार्यांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मागविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी अत्यंत तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. हे कर्मचारी गत अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. या कंत्राटी कर्मचारी व अधिकार्यांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने गत महिन्यात आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केल्याने या कर्मचार्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या कर्मचार्यांना विमा सुविधा लागू करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.
विमा योजनेत कर्मचार्यांचा समावेश करता यावा, यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती विहित नमुन्यात मागविण्यात आली आहे. जिल्हाभरातील कर्मचार्यांची माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. ही योजना त्वरित राबविण्यात येणार असल्यामुळे कर्मचार्यांची माहिती १४ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचा आदेश सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र सर्व संबंधित अधिकार्यांना ८ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे. विमा योजनेत सर्वच कर्मचार्यांचा समावेश करण्यात येणार असून, कोणताही कर्मचारी या योजनेपासून वंचित राहू नये, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.