गायवाड्यात घुसली नीलगाय; वनविभागने राबविले रेस्क्यू ऑपरेशन
By Atul.jaiswal | Updated: May 18, 2024 14:04 IST2024-05-18T14:04:11+5:302024-05-18T14:04:30+5:30
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहनात टाकले व सुरक्षित अधिवासात नेण्यात आले.

गायवाड्यात घुसली नीलगाय; वनविभागने राबविले रेस्क्यू ऑपरेशन
अकोला : पाण्याच्या शोधात भटकंती करत शहरात शुक्रवारी (दि. १७ मे)आलेली नीलगाय कृषी नगर भागातील एका गायवाड्यात येऊन बसली. वनविभागाच्या चमूने मोठ्या शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून निलगायीला जंगलात सोडले.
कृषी नगर भागातील मौर्य यांच्या गायवाड्यात शुक्रवारी रात्री अचनाक मोठी निलगाय घुसल्याने खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. घर मालक मौर्य, स्वप्नील गावंडे, अजिंक्य बंड, गोरव मौर्य, राज मौर्य यांनी वनविभागास कळविले. माहिती मिळताच वनपाल गजानन इंगळे यांनी वनरक्षक संघपाल तायडे, वनरक्षक गाडबैल, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, चालक यशपाल इंगोले, अक्षय खंडारे, महाराज पारस्कर या वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले.
नीलगाय ताकतवर व चपळ असल्यामुळे निर्णायक स्थितीत तिला घेरले. सोबत आणलेली जाळी तिच्या अंगावर टाकली व नंतर तिला व्यवस्थीत तात्पुरत्या स्वरूपात बांधुन घेतले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहनात टाकले व सुरक्षित अधिवासात नेण्यात आले. तेथे सोडताच निलगायीने जंगलात धूम ठाेकली.