बिबट्याच्या हल्ल्यात नीलगाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 01:00 AM2017-05-04T01:00:42+5:302017-05-04T01:00:42+5:30
पातूर : पातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील खानापूर बिटमध्ये १ मे रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नीलगायवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
पातूर : पातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील खानापूर बिटमध्ये १ मे रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नीलगायवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
खानापूर परिसरातील मोर्णा रोड येथे रमेश तुळशीराम राऊत यांच्या सर्व्हे नं. ८४/१ या शेतात आलेल्या नीलगायवर सोमवारी उत्तररात्री ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तिला ठार करून फस्त केले. मोर्णा धरण, खानापूर बिट, आष्टूल, पास्टूल, आगीखेड व खामखेड या परिसरात नेहमीच बिबट्याचा मुक्त संचार असतो. त्यामुळे या परिसरात नेहमीच पाळीव व वन्य प्राण्यांच्या बिबट्याने शिकार केल्याच्या घटना घडतात, तसेच आगीखेड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने चार नागरिकांना जखमी केले होते. आता बिबट्याने नीलगायला ठार केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. यावेळी वनरक्षक एस.यू. वाघ, वाय.पी. सरकटे व एम.डी. वाणी हे वनरक्षक उपस्थित होते. नीलगायचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून, तो पाच वर्षांपेक्षा मोठा आहे. त्याने सदर नीलगायला मारून फस्त केले आहे.
- जी.डी. देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातूर.