निमा अराेरा जिल्हाधिकारीपदी तर पापळकर यांची मनपा आयुक्तपदी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 10:39 AM2021-07-14T10:39:54+5:302021-07-14T10:40:00+5:30
Ias officers Transfer in Akola : दाेन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकमेकांच्या पदावर अदलाबदली करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या निर्णयाबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
अकोला: राज्य शासनाने महापालिका आयुक्त निमा अराेरा यांची अकाेला जिल्हाधिकारी पदावर तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची मनपाच्या आयुक्तपदी बदली केली. मंगळवारी रात्री शासनाचा बदली आदेश धडकला. दरम्यान, दाेन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकमेकांच्या पदावर अदलाबदली करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या निर्णयाबद्दल चर्चेला उधाण आले आहे. निमा अराेरा यांनी ८ फेब्रुवारी राेजी मनपाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली हाेती. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत त्यांची बदली हाेणे अपेक्षीत नव्हते. दरम्यान, राज्य शासनाने मंगळवारी रात्री प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बदली आदेश जारी केला. यामध्ये निमा अराेरा यांची अकाेला जिल्हाधिकारी पदावर तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकाेला महापालिकेत आयुक्तपदी बदली करताच जिल्हयाच्या प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पापळकर यांच्या नियुक्तीकडे लक्ष
जितेंद्र पापळकर २०१० मधील बॅचचे सनदी अधिकारी आहेत. तसेच निमा अराेरा २०१४ मधील बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. आजवर पापळकर यांनी निमा अराेरा यांना दिशानिर्देश दिले आहेत. पदसंवर्गातील सेवाज्येष्ठतेची बाब लक्षात घेता पापळकर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती हाेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारवाया थंडबस्त्यात
निमा अराेरा यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यापासूनच शहरात अतिक्रमण हटाव माेहीमेसह अनधिकृत इमारतींवर कारवाइचा बडगा उगारला हाेता. सत्ताधारी भाजपने घेतलेले ठराव त्यांनी विखंडनासाठी शासनाकडे पाठविले. अराेरा यांची जिल्हाधिकारी पदावर बदली झाल्यामुळे सदर कारवाया थंडबस्त्यात सापडण्याची चिन्हं आहेत.
शासनाने जिल्हाधिकारी पदावर बदली केल्याची माहिती आहे. परंतु अद्यापपर्यंत आदेशाची प्रत प्राप्त झाली नाही.
-निमा अराेरा आयुक्त,मनपा