प्राणघातक हल्यातील नऊ आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 03:35 PM2021-02-20T15:35:34+5:302021-02-20T15:35:41+5:30
Crime News जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयाने शनिवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील युसूफ अली खदान येथे युवतीच्या छेडखाणी वरून झालेल्या हाणामारीत तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या नऊ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयाने शनिवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
युसूफ अली खदान येथे एका युवतीच्या छेडखानीवरून दोन गटात प्रचंड हाणामारी झाली होती. यावेळी शेख शेरू पैलवान व त्याच्या साथीदारांनी संजय काळे यांचे भाऊ दीपक काळे मनिष बुंदेले व गणेश सोनोणे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. या हल्ल्यात दीपक काळे यांच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केल्याने त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली होती. या प्रकरणी संजय काळे यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख शेरू पैलवान, असगर, रोशन, शफिक, आरिफ, नुसरत, अनु, राजीक आणि एजाज यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाच कसून तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच के भालेराव यांच्या न्यायालयात या हाणामारी प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्यांना भारतीय दंड विधानाच्या कलम 307 अन्वये सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अड आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले.