क्रीडा संकुलमधील तरण तलावासाठी नऊ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 03:37 PM2019-03-30T15:37:30+5:302019-03-30T15:37:39+5:30
अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या क्रीडा संकुलमधील तरण तलाव सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे.
अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या क्रीडा संकुलमधील तरण तलाव सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे. हा तरण तलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी किमान नऊ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला गेला आहे. याबाबत अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला.
राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री दिवंगत अरुण दिवेकर यांनी क्रीडा संकुलची उभारणी केली होती. क्रीडा संकुल आणि व्यायाम शाळेसह विविध सेवा येथे सुरू केल्या होत्या. राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या संकुलचा ताबा दिवेकरांच्या निधनानंतर शासनाने घेतला; मात्र क्रीडा संकुल पूर्ववत सुरू करता आले नाही. या क्रीडा संकुलमधील तरण तलाव आणि इतर व्यायाम शाळेच्या सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, शासनाकडे नऊ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल पुढे आला. त्यामुळे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. जर या प्रस्तावास मंजुरी मिळाली तर अकोल्यात एक नव्हे, तर दोन तरण तलाव अकोलेकरांच्या सेवेत येतील, अशी माहिती आसाराम जाधव यांनी बोलताना दिली.