कृषीपंपधारक शेतकऱ्यांनो थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उरले नऊ दिवस
By Atul.jaiswal | Published: March 21, 2023 06:29 PM2023-03-21T18:29:14+5:302023-03-21T18:29:31+5:30
येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोला : कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत कृषी धोरणाचे दोन वर्ष निघून गेले. महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्ग व्याज, विलंब आकारात माफी, सुधारीत थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे ०९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्या वतीने कृषी अभियानाअंतर्गत कृषी धोरण २०२० राबविण्यात येत आहे. तीन वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्षही येत्या ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलतही ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारत माफी,तर सुधारीत थकबाकीतही ३० टक्के सुट देण्यात आली आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात आहे.
२०१ कोटी झाले माफ
अकोला जिल्ह्यात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी ५८० कोटीच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून २०१ कोटी माफ झाले आहेत. त्यामुळे सुधारित थकबाकीच्या ३७९ कोटीच्या थकबाकीतही ३० टक्के थकबाकी माफ होत असल्याने,शेतकऱ्यांना ७० टक्के हिश्श्यापोटी सुधारीत थकबाकीच्या केवळ २६५ कोटी आणि सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरायचे आहेत.
२ हजार शेतकऱ्यांनीच घेतला संपूर्ण लाभ
योजनेसाठी पात्र असलेल्या ६६ हजार ६५८ थकबाकीदार कृषीपंपापैकी २५ हजार ९६२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ २ हजार १७८ शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.