जमीन वाटपासाठी नऊ भूमिहीन लाभार्थींची निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:33 PM2019-01-09T12:33:03+5:302019-01-09T12:33:15+5:30
अकोला: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप करण्यासाठी मंगळवारी जिल्हा निवड समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील नऊ भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात आली.
अकोला: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप करण्यासाठी मंगळवारी जिल्हा निवड समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील नऊ भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या भूमिहीन लाभार्थींना २३.१७ एकर जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील भूमिहीन शेतमजूर, विधवा व परित्यक्ता महिलांना जमिनीचे वाटप करण्यात येते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय निवड समितीच्या सभेत भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने नऊ लाभार्थींची निवड करण्यात आली. योजनेंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर शिवारातील २३.१७ एकर जमीन वाटप करण्यासाठी पिंजर येथील भूमिहीन लाभार्थींकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये ३४ भूमिहीन लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून ‘ड्रॉ’ पद्धतीने नऊ भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीन पाच विधवा महिला आणि चार सर्वसाधारण भूमिहीन शेतमजुरांची जमीन वाटपासाठी निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या भूमिहीन लाभार्थींना लवकरच २३.१७ एकर जमीन वाटप करण्यात येणार आहे.
‘या’ भूमिहीन लाभार्थींची करण्यात आली निवड!
जमीन वाटप करण्यासाठी पिंजर येथील नऊ भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात आली. त्यामध्ये पांडुरंग रामा घोडे, सखाराम जानुजी वानखडे, सुरेश नामदेव रावेकर, भगवान तुळशीराम घोडे, मंगला संतोष घनगाव, शांता दादाराव इंगळे, मंगला सुनील घनगाव, बेबी महादेव डोंगरे व सिंधू किशन घनगाव यांचा समावेश आहे.