व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणातील नववा आराेपी जेरबंद
By सचिन राऊत | Published: May 24, 2024 09:36 PM2024-05-24T21:36:11+5:302024-05-24T21:36:33+5:30
पाेलिस काेठडी संपलेल्या दाेन आराेपींची कारागृहात रवानगी
अकोला: खंडणी मागण्याच्या उद्देशातून व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानीक गुन्हे शाखा व रामदास पेठ पाेलिसांनी नववा आराेपी विवेक उर्फ दादु अंबादास वराेटे यास अटक केली. या आराेपीला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली असून आधीच अटकेत असलेल्या ८ आराेपींची न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार जीन परिसरातून प्रतिष्ठीत व्यावसायिक अरुण वाेरा यांचे १३ मे राेजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते. पाेलिसांचा वाढता दबाव पाहता १५ मे राेजी रात्री आरोपींनी वोरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले हाेते. त्याच रात्री स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्रे फिरवीत १६ मे राेजी पहाटेपर्यंत पाच अपहरणकर्त्यांना बेड्या ठाेकल्या हाेत्या. त्यानंतर काही दिवसातच आठ आराेपींना अटक करण्यात आली हाेती. तर फरार असलेला नववा आराेपी विवेक उर्फ दादु अंबादास वराेटे रा. रा. जेतवन नगर बुध्द विहाराजवळ यास छत्रपती संभाजीनगर येथून शुक्रवारी अटक केली.
तर यापुर्वी १७ मे राेजी सहावा आराेपी सरफराज खान उर्फ राजा रा.कान्हेरी सरप याला अटक केल्यानंतर २१ मे राेजी रामदास पेठ पाेलिस स्टेशनचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक किशाेर पवार, कर्मचारी किशाेर गवळी, संताेष गवइ, आकाश जामाेदे यांनी चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे (१९)रा.जेतवन नगर खदान व मनीष उर्फ मन्या गजानन गाेपनारायण (२१) रा.शिर्ला अंधारे यांना अटक केली हाेती. या दाेन्ही आराेपींना बुधवारी न्यायालयासमाेर हजर केले असता, त्यांना दाेन दिवसांची २४ मे पर्यंत पाेलिस काेठडी हाेती. शुक्रवारी पाेलिस काेठडी संपल्यांने या दाेन आराेपींना न्यायालयासमाेर हजर केेले असता न्यायालयाने त्यांची कारागृहत रवानगी केली.