नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा अंतर्गत मूल्यमापन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 03:08 PM2019-08-24T15:08:57+5:302019-08-24T15:09:18+5:30
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुनर्विचार सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
अकोला : शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून राज्यात इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन सत्रनिहाय करण्यात येणार आहे. विषयानुसार २० गुणांचे हे मूल्यमापन असणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुनर्विचार सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेतर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्ता नववीसाठी व शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती; परंतु या सत्रात इयत्ता दहावीच्या निकालानंतर दोन्ही इयत्तांच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन योजनेचा पुनर्विचार करण्यात आला. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, लेखी मूल्यमापनासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी पुन्हा एकदा अंतर्गत मूल्यमापनाला सुरुवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार विविध प्रकल्प देऊन त्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. हे मूल्यमापन प्रत्येक विषयाला २० गुणांसाठी असणार आहे.
उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुण
विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण अनिवार्य असणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनामध्ये तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व बहुपर्यायी प्रश्न परीक्षा व उपक्रमांचा समावेश राहणार आहे.
अंतर्गत मूल्यमापनाचे एकूण ७० गुण
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा एकूण ७० गुणांची राहणार आहे. यामध्ये सर्वच विषयांसाठी २० गुणांची परीक्षा राहणार आहे.
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे मूल्यमापन पूर्वीप्रमाणेच करण्यात येणार आहे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अकोला.