नववी-दहावीतील व्याकरण कमी केल्याने मराठी भाषेवर घाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:03 PM2019-09-27T14:03:32+5:302019-09-27T14:03:39+5:30
व्याकरणात वृत्त व अलंकार हा प्रकार नसेल तर भाषा प्रभावी होणार तरी कशी, असा सवाल मराठी विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासनाच्या मूल्यमापन आढावा समितीच्या शिफारशींनुसार इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा २0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले; मात्र हे करताना गत शैक्षणिक वर्षात बदल करण्यात आलेल्या शैक्षणिक संकल्पनांना बाजूला सारत मराठी विषयाचे व्याकरण कमी करण्यात आले. हा मराठी भाषेवर घाला असून, व्याकरणात वृत्त व अलंकार हा प्रकार नसेल तर भाषा प्रभावी होणार तरी कशी, असा सवाल मराठी विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शैक्षणिक वर्ष २0१९-२0 पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी व समाजशास्त्र विषयात अंतर्गत मूल्यमापन सुरू केले आहे. यात प्रथम भाषा मराठीमधील व्याकरणाचे महत्त्व कमी केले आहे. २0 गुणांचे व्याकरण १६ गुणांचे केले आहे.
चार गुणांचे वृत्त आणि अलंकार हे व्याकरणातून वगळले. मराठी भाषेचे सौंदर्य कमी करण्याचा हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना कठीण जाते म्हणून व्याकरणातून वृत्त व अलंकार वगळणे योग्य नाही.
आठवीच्या विद्यार्थ्यांना वृत्त व अलंकार शिकविला जातो; परंतु नववी व दहावीच्या मराठी व्याकरणातून हे वगळून, विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या ज्ञानापासून अनभिज्ञ ठेवण्याचा प्रकार शासनाचा शिक्षण विभाग करीत आहे. एकीकडे आम्ही मराठी भाषा जतन करण्याच्या गप्पा करतो आणि दुसरीकडे मराठी भाषेवरच घाला घालण्याचाही प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया मराठी विषयाच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
व्याकरणातून अलंकार व वृत्त वगळण्याची काही गरज नव्हती. व्याकरण हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे. ते विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्येसुद्धा व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. विद्यार्थ्यांना व्याकरणच नसेल तर मराठी भाषा ते कशी शिकणार? आठवीच्या विद्यार्थ्यांना अलंकार व वृत्त शिकविल्या जाते; परंतु नववी-दहावीत विद्यार्थ्यांना ते कठीण जाते म्हणून वगळणे योग्य नाही. चुकीचा निर्णय आहे.
- रक्षा जाधव, मराठी विषय शिक्षिक
बाबासाहेब धाबेकर विद्यालय
मराठी भाषेचे सौंदर्य हे वृत्त व अलंकारामुळे वाढते. वृत्तानुसार कवितेला चाल लावू शकतो आणि नेमके हेच व्याकरणातून वगळल्याने विद्यार्थी व्याकरणापासून अनभिज्ञ राहतील. त्यांची भाषा प्रभावी होणार नाही. लिखाणाचे सौंदर्य वाढविण्यासाठी वृत्त व अलंकार महत्त्वाचे आहे. मराठी निबंध लिहिताना अलंकार नसेल तर ते अडचणीचे ठरेल.
- स्वाती बापट, मराठी विषय शिक्षिका
बाल शिवाजी माध्य. शाळा
अलंकार हा भाषेचा आत्मा आहे. तोच वगळला तर विद्यार्थ्यांना भाषेचे सौंदर्य कसे कळणार? व्याकरणात अलंकार व वृत्त दोन्ही महत्त्वाचे आहेत. नववी-दहावीचा पेपर पॅटर्न सोपा केला. हे ठीक आहे; परंतु व्याकरणातून चार गुणांचे अलंकार व वृत्त वगळून विद्यार्थ्यांना व्याकरणापासून अनभिज्ञ ठेवण्याचा हा प्रकार आहे. गद्य विभागात ६-७ गुणांचे उतारे ठेवले आहे. १८ गुणांचे गद्य विचारणार आहेत. यातून काही वगळले असते तर चालले असते.
- नंदकिशोर बरिंगे,
मराठी विषय शिक्षक, जागृती विद्यालय
मराठी भाषा जतन करायची असेल तर व्याकरण महत्त्वाचे आहे. सध्याच्या इंग्रजी युगात विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण शिकविण्याची गरज आहे. त्यांना व्याकरणापासून दूर करण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. व्याकरण कठीण जाते म्हणून ते वगळणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना अलंकार व वृत्तच माहीत नसेल तर त्यांची मराठी भाषा प्रभावी होणार नाही. आत्माच काढून शिक्षण विभागाला काय साधायचे आहे?
- सोनाली पाटील,
मराठी विषय शिक्षिका
धाबेकर विद्यालय, बार्शीटाकळी