नववी, दहावीसाठी शिक्षक संच मान्यता
By admin | Published: June 29, 2017 01:31 AM2017-06-29T01:31:32+5:302017-06-29T01:31:32+5:30
पाचवी ते आठवीसाठीही एक पद मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शालेय कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळांना पायाभूत पदांच्या मर्यादेत शिक्षक संच मान्य करण्याबाबत शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, अनुदानित व विनाअनुदानित व इतर सर्व शाळांमधील संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून इयत्ता नववी, दहावी वर्गामध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास किमान शिक्षकांची तीन पदे आणि पाचवी ते आठवी वर्गामध्ये २० पेक्षा अधिक विद्यार्थी पटसंख्या असल्यास शिक्षकाचे एक पद मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१६ व १७ च्या संच मान्यतेमध्ये नववी ते दहावीच्या गटामध्ये तीन शिक्षकांऐवजी दोन, पाचवी ते आठवी वर्गासाठी शून्य शिक्षक मंजूर झाले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून गतवर्षीच्या संच मान्यतेमध्ये इयत्ता नववी, दहावीच्या वर्गासाठी शिक्षकांची तीन पदे आणि पाचवी ते आठवी वर्गासाठी एक शिक्षक पद मंजूर करण्याची मागणी केली होती. उशिराने का होईना, प्राथमिक शिक्षक समितीची ही मागणी शिक्षण आयुक्तांनी मान्य केल्याचे पत्र शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून शिक्षक पदांना मंजुरात देण्यात आली आहे. शाळांमध्ये मूळ वर्ग असल्यास अर्थात आठवी ते दहावीचा वर्ग असल्यास मुख्याध्यापक एक पद, नववी ते दहावीसाठी तीन शिक्षक पदे आणि आठवीसाठी एक पद अशी एकूण शिक्षक संवर्गात पाच पदे तर पाचवी ते दहावी वर्ग असणारी शाळा असल्यास मुख्याध्यापक एक पद, इयत्ता पाचवी ते दहावीसाठी आठ शिक्षक अशी नऊ पदे मंजूर होणे आवश्यक आहेत. एनआयसी स्तरावरून दुरुस्ती केल्यानंतर यापेक्षा कमी किंवा अधिक पदे मंजूर झाली असल्यास त्या शाळांची यादी शिक्षण संचालनालयास तातडीने कळवावी, तोपर्यंत सुधारित संच मान्यता शाळांना वितरित करू नये, असे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.