बसगाड्यांचे अपघात रोखण्यासाठी आता टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 03:49 PM2019-02-10T15:49:43+5:302019-02-10T15:49:52+5:30
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे टायर फुटून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता एसटीच्या टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’ भरली जाणार आहे.
- संजय खांडेकर
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे टायर फुटून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’ भरली जाणार आहे. अकोला एसटी विभागासाठी नायट्रोजन कॉम्प्रेसर दाखल झाले असून, उन्हाळा सुरू होण्यापूर्वी बसगाड्यांच्या टायरमध्ये नायट्रोजन एअर भरण्याचा प्रयोग सुरू होत आहे.
विदर्भातील उन्हाळ्याचे तापमान ४८ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. वाढत्या तापमानामुळे धावत्या बसगाड्यांचे टायर फुटून अपघात होण्याच्या घटना कायम सुरू असतात. अनेकदा अशा घटनांचा सामना चालक-वाहकांना करावा लागतो. अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील प्रत्येक आगारात नायट्रोजन एअर कॉम्प्रेसर देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील काही निवडक आगारात नायट्रोजन कॉम्प्रेसर पाठविण्यात आले आहे. त्यात अकोला आगार क्रमांक दोनमध्येही नायट्रोजन एअर कॉम्प्रेसरची किट दाखल झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नायट्रोजन हवा टायरमध्ये भरण्यास सुरुवात होणार आहे. अकोला-वाशिम विभागात एकूण ४१९ बसगाड्या असून, या गाड्यांच्या टायरमध्ये यापुढे सामान्य हवा भरल्या जाणार नाही. नायट्रोजन हवा त्यात भरली जाणार आहे.
- टायरमध्ये नायट्रोजन एअर भरल्याने, टायरचे तापमान आहे त्या स्थितीत राहील. त्यामुळे बाह्य तापमानाचा आणि स्पीडने वाढणाऱ्या तापमानाचा फरक टायरवर होणार नाही. परिणामी, अपघाती घटनांचे प्रमाण कमी होईल आणि टायरचे लाइफ वाढणार आहे.
-अमोल गाडबैल, यंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा, एसटी विभाग, अकोला.