Indurikar Maharaj: “माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्...”; युट्यूबर्सवर टीका करताना इंदुरीकर महाराजांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 09:21 AM2022-03-08T09:21:59+5:302022-03-08T09:22:44+5:30
आपल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका करत संताप व्यक्त केला.
अकोला: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अकोला येथील एका कीर्तनात इंदुरीकर महाराजांची टीका करताना जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. यावेळी इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर युट्यूबर्स होते. माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ शेअर करून हजारो युट्यूबर्स कोट्यधीश झाले आणि माझ्या कीर्तनाच्या क्लिप तयार करून मलाच न्यायालयात उभे केले, अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इंदुरीकर महाजारांच्या कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळेस करण्यात आलेल्या निरुपणावेळी इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच कीर्तनाच्या क्लिप बनवून मलाच न्यायालयात खेचले. यांचे वाटोळच होणार. यांचे चांगले होणार नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर जोरदार हल्लाबोल केला.
संपूर्ण कीर्तनात युट्यूबवर्सवर संताप
इतकेच नाही तर, कोट्यवधी रुपये कमावले यांनी आणि अडचणीत आलो मी. कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. या कीर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकले. व्हिडिओ काढू नका असे त्यांनी अनेकदा सांगितले. संपूर्ण कीर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.
दरम्यान, इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वादात अडकले आहेत. सन २०२० साली एका कीर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला मुलगा होतो आणि विषम तिथीला मुलगी होते, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांचे हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावून गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय, कोरोना लसीकरणावर बोलताना, मी सगळीकडे फिरतो. लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले होते.