महापालिकेच्या सभेत गोंधळ!

By admin | Published: June 29, 2017 01:04 AM2017-06-29T01:04:31+5:302017-06-29T01:19:26+5:30

डुकराचे पिल्लू सोडले; माइकची तोडफोड अन् नगरसेवकांचा ठिय्या

NMC municipality confusion! | महापालिकेच्या सभेत गोंधळ!

महापालिकेच्या सभेत गोंधळ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मालमत्ता करवाढ, डुकरांचा सुळसुळाट, दलितेतर-नगरोत्थानच्या निधी वाटपातील असमानतेच्या मुद्यावर बोट ठेवून विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत बुधवारच्या आमसभेत गोंधळ घातला. आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी डुकराचे पिल्लू सोडण्यात आले तर सभेत झालेल्या वादंगामध्ये माइकची तोडफोड करीत, निधी वाटपाच्या ठराव संमतीसाठी मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली; मात्र त्याला महापौरांनी प्रतिसाद न दिल्याने नगरसेवकांनी सभागृहातच जमिनीवर बसून ठिय्या दिला.
मागील सभेतील इतिवृत्त आणि करवाढीचा मुद्दा आमसभेच्या सुरुवातीलाच शिवसेनेने उचलला. यावर विशेष सभा होऊ शकते; मात्र आज हा विषय घेता येणार नाही, अशी भूमिका महापौर विजय अग्रवाल यांनी घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी शांतता धारण केली. मात्र थोड्याच वेळात भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी महानगरातील डुकरांच्या सुळसुळाटाचा मुद्दा उचलला अन् बोलता-बोलता महापौर आयुक्तासमोर सोबत आणलेल्या बास्केटमधून डुकराचे पिल्लू बाहेर काढले. चक्क डुकराचे पिल्लू सभागृहात आणून डुक्कर पकडण्याच्या निविदांचे काय झाले म्हणून विचारणा केली. त्यावर आयुक्त अजय लहाने यांना चारदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर भाजप नगरसेवक विजय इंगळे यांनी महानगरातील कचरा प्रश्नावर महापौर व आयुक्तांना घेरले. या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत नगरसेवक सुभाष खंडारे व सतीश ढगेंनीदेखील पथदिव्याच्या मुद्याला हात घालून आयुक्तांची वागणूक ठीक नसल्याचा आरोप केला. भाजपच्याच नगरसेवकांनी सभागृहात विरोधकांची भूमिका घेतल्यानंतर विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी करवाढीचा विषय पुन्हा छेडला. यावेळी भाजपचे काही तसेच शिवसेना-काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाल्याने चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. या वादातच साजिद खान यांनी डायसवरील माइक ओढून तोडला. त्यावर महापौरांनी साजिद यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात येइल असा इशारा देत नुकसानभरपाई त्यांच्या मानधनातून कापण्याचे आदेश दिलेत. सरतेशेवटी चालू वर्षातील दलितेतर व नगरोत्थानच्या विकास कामांना मंजुरी देण्यासाठी निधी वाटपात समानता नसल्याने विरोधी पक्षनेता काँग्रेसने दोन्ही विषयांवर सभागृहात मतदानाची मागणी केली. सर्व प्रक्रिया कायदेशीर आणि नियमानुसार असल्याचे सांगून ही मागणी फेटाळून महापौरांनी दोन्ही विषय मंजूर केले. त्यामुळे साजिद खान यांचेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले व ‘दादागिरी और भ्रष्टाचारी नही चलेंगी’, असे नारे दिले.

Web Title: NMC municipality confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.