मनपा अधिकार्‍यांनी धाव घेताच कारवाईला वेग! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:10 AM2017-11-01T01:10:33+5:302017-11-01T01:10:52+5:30

अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारा इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठय़ा धडाक्यात कारवाईला सुरुवात केली होती. पाचव्या दिवशी मात्र मनपाची कारवाई थंडावल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.

NMC officials run the pace as soon as possible! | मनपा अधिकार्‍यांनी धाव घेताच कारवाईला वेग! 

मनपा अधिकार्‍यांनी धाव घेताच कारवाईला वेग! 

Next
ठळक मुद्दे‘बॉटल नेक’मालमत्ताधारकांकडून इमारत पाडण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारा इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठय़ा धडाक्यात कारवाईला सुरुवात केली होती. पाचव्या दिवशी मात्र मनपाची कारवाई थंडावल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. मालमत्ताधारकांकडून इमारत पाडण्यास होणारा विलंब लक्षात घेता मनपा उपायुक्त समाधान सोळंके, उपायुक्त सुरेश सोळसे यांनी इन्कम टॅक्स चौकात धाव घेतली. तोपर्यंत अवघ्या एका जेसीबीच्या मदतीने थातूरमातूर काम सुरू होते. दुपारी ३ नंतर चार जेसीबीच्या मदतीने इमारतींचा भाग पाडण्यास सुरुवात करण्यात आली.
नेहरू पार्क चौक ते थेट संत तुकाराम चौकापर्यंत १५ मीटर रुंद रस्ता, त्यामध्ये दीड फुट रुंद दुभाजक आणि एलईडी पथदिवे लावल्या जातील. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत ५00 मीटरचा रस्ता अतिशय निमूळता तयार होणार असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरला. या ठिकाणी ‘बॉटल नेक’ निर्माण झाल्यास भविष्यात अकोलेकरांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करण्यासह अपघातांना सामोरे जाण्याची वेळ आली असती. त्यानुषंगाने महापालिका प्रशासनाने जोपर्यंत ‘बॉटल नेक’ दूर केला जात नाही, तोपर्यंत रस्ता रुंदीकरणाची घाई न करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर स्थानिक मालमत्ताधारकांनीसुद्धा शहर विकासाचे भान ठेवत रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्याला संमती दिली. यातील दोन मालमत्ताधारकांनी इमारतींचे बांधकाम स्वत:हून काढणार असल्याचे सांगत मनपाला वेळ मागितला. काही मालमत्ताधारकांनी दोन-चार मजुरांच्या मदतीने इमारतीचा भाग तोडण्यास प्रारंभ केला; परंतु त्यांची संथ गती पाहता पंधरा दिवसांच्या कालावधीनंतरही रस्ता रुंदीकरणाला सुरुवात होणार किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मनपाच्या जेसीबी आहेत कोठे?
इन्कम टॅक्स चौक ते निशू नर्सरी कॉन्व्हेंट मार्गावरील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्स ते दुर्गा गॅस एजन्सीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्‍या मालमत्तांचा काही भाग तोडण्याची कारवाई सुरू होणे अपेक्षित होते. तसेच एसबीआय बँके पासून ते लक्ष्मी हार्डवेअर व बळवंत मेडिकलवरील इमारत ते हॉटेल वैभवपासून ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या इमारतींचा भाग तोडून मलबा तातडीने हटविण्याची गरज होती. या सर्व कामांसाठी केवळ एका जेसीबीचा वापर सुरू होता. इतर जेसीबींचा वापर का करण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित होतो.

अतिक्रमण, मोटारवाहन विभागाचा ताळमेळ नाही!
रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या भल्या मोठय़ा इमारतींना हटविणे ही महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंंतची सर्वात मोठी कारवाई मानल्या जाते. याकरिता नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग व मोटारवाहन विभागाचे नियोजन व भूमिका महत्त्वाची ठरते. प्रशासनाने २७ ऑक्टोबर रोजी कारवाई सुरू केली. तेव्हापासून ते आजपर्यंत अतिक्रमण विभाग व मोटारवाहन विभागाचा ताळमेळ जुळत नसल्याचे दिसून आले आहे. अतिक्रमण विभागाचे अनेक कर्मचारी कारवाईदरम्यान हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे, तर वेळेवर गरजेनुसार जेसीबी देऊन मलबा उचलण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याची माहिती आहे. 

विरोधी पक्षनेत्यांनी केली पाहणी
महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी मंगळवारी इन्कम टॅक्स चौकात जाऊन स्थानिक व्यावसायिकांसोबत चर्चा केली. काही मालमत्ताधारक स्वत:हून इमारत तोडत असल्यामुळे त्यांना पुरेसा अवधी देण्याची मागणी साजीद खान यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. तसेच त्यांना तातडीने ‘टीडीआर’ देण्यासह आर्थिक मदत देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. 

विद्युत पोल हटविण्यास प्रारंभ
रस्ता रुंदीकरणाचे काम ‘पीडब्ल्यूडी’मार्फत होत असून, रस्त्यालगतचे अतिक्रमण व विद्युत पोल हटविण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. त्या पृष्ठभूमीवर महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकापर्यंंत रस्त्यालगतचे विद्युत पोल, रोहित्र हटविण्याचे काम मनपाच्या विद्युत विभागाने सुरू केले आहे. 

Web Title: NMC officials run the pace as soon as possible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.