कचर्याच्या व्यवस्थापनासाठी मनपा सरसावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 01:42 PM2017-05-06T13:42:58+5:302017-05-06T13:42:58+5:30
नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा एकत्र न करता तो वेगवेगळा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे नागरिकांना आवाहन
अकोला: ह्यस्वच्छ महाराष्ट्र अभियानह्णच्या माध्यमातून शहराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर नानाविध प्रयोग राबवले जात आहेत. १ मे पासून घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, यापुढे नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा एकत्र न करता तो वेगवेगळा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहराच्या कानाकोपर्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचला असून, नाले-गटारे तसेच सर्व्हिस लाइनमध्ये घाण-कचरा तुंबला आहे. नागरिकांच्या घरातून निघणारा कचरा जमा करण्यासाठी मनपा प्रशासनाने घंटा गाड्यांची व्यवस्था केली असून, नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कचर्याची साठवणूक केली जाते. घरातून निघणारा कचरा एकत्र करून घंटागाड्यांमध्ये टाकला जातो. त्यामध्ये शिळे अन्न, सडका भाजीपाला, सडकी फळे यांच्यासोबतच प्लास्टिक, काचाचे तुकडे, कापड, रबर,थर्माकॉल आदींचा समावेश राहतो. हा कचरा फेकल्यानंतर तो खाण्यासाठी जनावरांसह कुत्रे, डुकरांची गर्दी होते. जनावरांच्या पोटात प्लास्टिक जात असल्यामुळे त्यांच्यावरही मृत्यू ओढवत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत यापुढे अकोलेकरांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटा गाडीमध्ये टाकण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
दोन डस्टबीन ठेवाव्यात!
नागरिकांनी त्यांच्या घरी ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी दोन कचरा पेट्यांची (डस्टबीन)व्यवस्था करण्याची गरज आहे. ओला कचर्यात शिजलेले अन्न, शिळे अन्न, सडका भाजीपाला, फळे आदींचा समावेश करावा. तर सुका कचर्यात प्लास्टिक पिशव्या, धातू, थर्माकॉल, काचाचे तुकडे, कापड, कातडे, रबर यांचा समावेश करावा.
घंटागाडीत व्यवस्था!
घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचर्याची साठवणूक केल्यानंतर ओला व सुका कचर्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यानुषंगाने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत.