अपहार प्रकरणात मनपा उपअभियंता निलंबित
By admin | Published: October 14, 2016 02:08 AM2016-10-14T02:08:32+5:302016-10-14T02:08:32+5:30
शिव उद्यानची आवारभिंत बांधलीच नाही; दोन बडतर्फ.
अकोला, दि. १३- प्रभाग क्रमांक ३६ मधील खेतान नगरस्थित शिव उद्यानची आवारभिंत न बांधताच त्याचे ४ लाख ६४ हजार रुपयांचे देयक उकळल्याचा प्रताप महापालिकेचे उपअभियंता जयप्रकाश मनोहर, मानसेवी कनिष्ठ अभियंता घनश्याम उघडे व राजेश श्रीवास्तव यांच्या अंगलट आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गुरुवारी आयुक्त अजय लहाने यांनी उपअभियंता मनोहर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून दोन्ही मानसेवी कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
खेतान नगरस्थित शिव उद्यानची ११0 मीटर लांब अंतराची आवारभिंत बांधण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने डिसेंबर २0१२ मध्ये मनपा निधीतून ४ लाख ९0 हजारांची निविदा मंजूर केली. शोएब नामक कंत्राटदाराने आवारभिंत बांधण्याचा कंत्राट घेतला. कंत्राटदाराने पुढील तीन वर्षांंंपर्यंंंत कामाला सुरुवातच केली नाही. त्यामुळे खुद्द बांधकाम विभागानेच १६ मे २0१५ रोजी पत्राद्वारे सदर काम रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे वृक्षारोपणाच्या रकमेतून शिव उद्यानच्या न बांधलेल्या आवारभिंतीचे ४ लाख ६४ हजारांचे देयकदेखील उकळले. यादरम्यान, महापालिका प्रशासनाने नव्याने शिव उद्यानच्या विकास कामांसाठी नगरोत्थान योजनेतून १0 लाखांची तरतूद केली. या कामासाठी निविदा प्रक्रिया प्रकाशित झाली. या दोन्ही कामासंदर्भात आयुक्तांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये शिवा मोहोड यांच्या तक्रारीचा समावेश होता. या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.