दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली एनएमएमएस परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:25 PM2019-12-09T12:25:52+5:302019-12-09T12:26:04+5:30
परीक्षेला जिल्ह्यातून २ हजार ५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
अकोला : इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी एनसीईआरटी नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेतल्या जाते. यंदाची परीक्षा आठ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेला जिल्ह्यातून २ हजार ५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
शहरातील भारत विद्यालय, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल, शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, शिवाजी विद्यालय अकोट, जागेश्वर विद्यालय, सेठ बन्सीधर विद्यालय, गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी या आठ परीक्षा केंद्रांवर एकूण २,0५१ विद्यार्थी होते. परीक्षेमध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी ९0 गुणांचे ९0 बहुपर्यायी प्रश्न, दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणीमध्ये इ. सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, नागरीकशास्त्र, भूगोल असे ९0 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. अ.भा. पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीधारकांची संख्या १ लाख इतकी आहे. राज्यासाठी ११ हजार ६६२ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिन्यात लागणार आहे. शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी इ. नववी ते १२ वी पर्यंत १ हजार रुपये प्रमाण शिष्यवृत्ती दिली जाते.
पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी इ. नववी, दहावीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. ही परीक्षा केंद्र प्रमुख मनीषा अभ्यंकर, इम्तियाज अहेमद खान, दिवाकर वानखडे, मीना धुळे, सुनील मसने, राजेंद्र देशमुख, प्रफुल्ल टोपले, गजेंद्र काळे यांनी काम पाहिले. परीक्षा केंद्राला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, विस्तार शिक्षण अधिकारी अरविंद जाधव, संजय मोरे, विज्ञान पर्यवेक्षक शब्बीर हुसैन, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, इकबाल भाई यांनी भेटी दिल्या. (प्रतिनिधी)