ना धडक कारवाई, ना वसुली; टॅक्स विभाग ढिम्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:05 PM2019-02-18T13:05:05+5:302019-02-18T13:05:12+5:30
अकोला: येत्या ३१ मार्चपर्यंत मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाला ७१ कोटी रुपये थकीत टॅक्स वसूल करायचा आहे. त्यासाठी वसुली पथकांचे गठन करीत झोननिहाय ४०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली.
अकोला: येत्या ३१ मार्चपर्यंत मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाला ७१ कोटी रुपये थकीत टॅक्स वसूल करायचा आहे. त्यासाठी वसुली पथकांचे गठन करीत झोननिहाय ४०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली. हा सर्व द्राविडी प्राणायाम करून ११ दिवसांचा कालावधी होत असला तरी आजपर्यंत थकबाकीदारांवर ना धडक कारवाई झाली ना वसुली. टॅक्स वसुलीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपकडून शास्ती अभय योजनेला वारंवार दिली जाणारी मुदतवाढ पाहता वसुली निरीक्षकसुद्धा दबावात कामकाज करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या सबबीखाली मोठा गाजावाजा करीत शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन केले. सुधारित करवाढ केल्यानंतर विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याचे दावे केले. संपूर्ण शहरात १ लाख ४५ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. यामध्ये हद्दवाढ झालेल्या नवीन भागातील ४१ हजार मालमत्तांचा समावेश आहे. या सर्व मालमत्ताधारकांवर सुधारित कर आकारणी केल्यामुळे मनपाला वर्षाकाठी किमान ५८ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होणार आहे. यादरम्यान, गतवर्षीची थकबाकी व चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा आकडा १०४ कोटींच्या आसपास होता. त्यापैकी वर्षभरात मालमत्ता कर वसुली विभागाने केवळ ३३ कोटी रुपये वसूल करण्यापर्यंत मजल गाठली. यातही प्रामुख्याने मध्यमवर्गीय मालमत्ताधारकांचा समावेश असल्याची माहिती आहे. उर्वरित ७१ कोटी रुपये वसूल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. ३१ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत थकबाकीची रक्कम वसूल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी टॅक्स विभागाला दिले आहेत. त्यानुषंगाने या विभागाने १०५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ३५ पथकांचे गठन करीत झोननिहाय १०० बड्या थकबाकीधारकांची यादी तयार केली. संबंधितांवर मालमत्तांसह साहित्य जप्तीची कारवाई करण्याचा गर्भित इशाराही दिला. नंतर कोठे माशी शिंकली देव जाणे. अकरा दिवस उलटून गेल्यावरही आजपर्यंत मनपा प्रशासनाने ना धडक कारवाई केली ना मोठ्या रकमेची वसुली केल्याचे चित्र समोर आले आहे.
...तोपर्यंत शास्तीची रक्कम वाढेल!
करवाढीच्या विरोधात नागपूर खंडपीठात भारिप-बमसं, काँग्रेसने याचिका दाखल केल्या. भारिपच्या अर्जावर शासनाकडून आता मे महिन्यात भूमिका स्पष्ट केली जाईल. तोपर्यंत टॅक्सचा भरणा न करणाºया मालमत्ताधारकांवर शास्तीचा बोजा चढणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे.
आयुक्तांनी कारवाई केली तरीही...
टॅक्स विभागातील वसुली निरीक्षक कामचुकारपणा करीत असल्याचे ध्यानात आल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन सहायक कर अधीक्षकांसह २५ वसुली निरीक्षकांची वेतनवाढ रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतरही कारवाईला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.