अकोला जिल्ह्यात शेतीकामासाठी मजूर मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:44 PM2019-11-24T13:44:08+5:302019-11-24T13:44:16+5:30
, कापूस वेचणीसाठी मजूर अडून पाहत असून, कापूस वेचणीसाठी दहा रुपये किलोची मागणी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उशिरा आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन नासावले गेले. कापूस आणि ज्वारी काही प्रमाणात बऱ्यापैकी आहे. शेतात उभे असलेले खरिपाचे आहे ते पीक काढून रब्बीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहे; मात्र जिल्ह्यात शेतमजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कापूस वेचणीसाठी मजूर अडून पाहत असून, कापूस वेचणीसाठी दहा रुपये किलोची मागणी करीत आहेत. ऐन हंगामाच्या वेळी मजूर अडून पाहत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेळघाटातून मजुरांचे खटले बोलाविले आहेत.
खरिपाचे पीक चांगले येत असताना उशिराच्या अतिवृष्टीने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास ओढून नेला. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेहमीप्रमाणे सोयाबीनची आवक झाली नाही.
दरम्यान, कापूस आणि ज्वारीचे पीक अजूनही शेतात उभे आहे. कापूस वेचणीला आणि हायब्रीड सोंगण्यासाठी मजूर वर्ग मिळत नसल्याने शेतकरी त्रासला आहे. साडेतीनशे रुपये रोज देऊ करूनही शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांच्या मुकरदमालादेखील दहा मजुरांमागे एक अतिरिक्त मजुरी द्यावी लागत आहे.
एकीकडे कापसाला आणि ज्वारीला बाजारात फारसा भाव नसला तरी शेतकºयाला मजुरीवर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रासला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात राहणाºया कोरकू कुटुंबीयांना स्वस्त मजुरीने अकोल्यात आणले जात आहे. दोन महिने कामकाज मिळत असल्याने कोरकू मजुरांचे जथे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसत आहेत.
कापूस वेचणी झाली ७ ते १० रुपये किलो
अनेक ठिकाणी मजुरांनी रोजंदारीऐवजी किलोप्रमाणे कापूस वेचणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कापूस वेचणीचे दर आता ७ ते १० रुपये किलोच्या दराने सुरू झाले आहे. मजुरांची बांधणी करून ठेवणाºया मुकरदमाचे भाव वाढले. मजुरांचे जथे आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहेत.