आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये; शरद पवारांनी दिला होता काँग्रेसला सल्ला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:44 PM2024-04-02T18:44:43+5:302024-04-02T19:06:35+5:30
Prakash Ambedkar Akola: प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार न देता आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही जागावाटप निश्चित झाले नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मविआसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आंबेडकर यांनी आपण काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार वंचित आघाडीने नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागांवर काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार न देता आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु काँग्रेसने धक्कातंत्राचा अवलंब करत डॉ. अभय पाटील यांना अकोल्यातून काल उमेदवारी जाहीर केली.
अकोल्याच्या जागेबाबत आता एक नवी माहिती समोर आली असून प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये, असं शरद पवारांनी काँग्रेसला सुचवलं होतं, असे समजते. आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे आणि हा वर्ग दुखावला जाऊ नये, यासाठी पवारांनी काँग्रेसला हा पर्याय सुचवला होता, अशी माहिती आहे. मात्र पवारांच्या या सल्ल्यानंतरही काँग्रेसने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात आपली ताकद उभी केली आहे. या ताकदीचा अनुभव मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्षांना आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला अनेक जागांवर वंचितचा फटका बसला. वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांच्या पदरी पराभव आला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने केला. मात्र मविआ नेत्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. असं असलं तरी देशात भाजपला रोखण्यासाठी आपण काँग्रेसला काही जागांवर मदत करण्यास तयार असल्याचं आंबेडकर यांनी जाहीर केलं होतं. मात्र वंचितने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यास सकारात्मकता न दाखवल्याने काँग्रेस हायकमांडने सोमवारी रात्री डॉ. अभय पाटील यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली.
२०१९ मध्येही अभय पाटील होते रिंगणात
डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसने २०१९ मध्येही उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. पाटील तेव्हा शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी होते. निवडणूक लढवण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. डॉ. पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजीनामाही दिला होता. मात्र, शासनाने तेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना उमेदवारी जाहीर होऊनही निवडणूक लढवता आली नव्हती.