दिवाळीपूर्वीच ‘एटीएम’मध्ये ठणठणाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:38 PM2018-11-02T13:38:17+5:302018-11-02T13:38:52+5:30
गुरुवारी सकाळी शहरातील अनेक भागांमधील एटीएमवर ठणठणाट असल्याचे दिसून आले. एटीएम रोख नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली.
अकोला: दिवाळी उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहेत. सध्या खरेदीची लगबग सुरू झाली असून, नागरिकांना पैशांची गरज भासू लागल्याने, नागरिक ‘एटीएम’वर धाव घेत आहेत. गुरुवारी सकाळी शहरातील अनेक भागांमधील एटीएमवर ठणठणाट असल्याचे दिसून आले. एटीएम रोख नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली.
शहरातील जठारपेठ, रतनलाल प्लॉट, कौलखेड, रिंग रोड, तुकाराम चौक, नेहरू पार्क चौक, जेल चौक आदी भागातील एटीएममधील रोख संपल्यामुळे नागरिकांना खाली हात परतावे लागले. दिवाळीपूर्वीच एटीएमचे दिवाळे निघत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एका एटीएमवर रोख नसली तर दुसऱ्या एटीएमवर धाव घ्यावी लागत आहे. तेथेही रोख नसेल तर तीन-चार एटीएमवर फिरावे लागत असल्याचे गुरुवारी दिसून आले. विशेष म्हणजे, या भागामधील एकाही एटीएमवर ‘नो कॅशचा’ बोर्ड नव्हता आणि सुरक्षारक्षकही तैनात नव्हता. दिवाळी तोंडावर ‘एटीएम’मध्ये ठणठणात दिसून येत असल्याने नागरिकांची आर्थिक गैरसोय होत आहे.
कॅश नसलेले ‘एटीएम’
एसबीआय एटीएम कौलखेड आणि रिंग रोड, अॅक्सिस बँक एटीएम जेल चौक, बँक आॅफ इंडिया एटीएम नेहरू पार्क चौक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया एटीएम कौलखेड चौक, एचडीएफसी एटीएम सिंधी कॅम्प.