कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना शुल्क नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:19 AM2020-06-24T10:19:57+5:302020-06-24T10:20:03+5:30
कापूस खरेदी तसेच जिनिंग फॅक्टरीमधे वजन काटा व कापसाची गाडी खाली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये.
अकोला : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व महाराष्ट्र कापूस महासंघामार्फत हमी दराने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू असून, जिल्ह्यातील कापूस खरेदी तसेच जिनिंग फॅक्टरीमधे वजन काटा व कापसाची गाडी खाली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण लोखंडे यांनी २२ जून रोजी संबंधित अधिकाºयांना दिले.
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व महाराष्ट्र कापूस महासंघाच्या जिल्ह्यातील अधिकाºयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील कापूस खरेदीचा आढावा घेत, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता, हमी दराने कापूस खरेदीची प्रक्रिया गतिमान करून पात्र सर्व शेतकºयांकडील कापूस खरेदी करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या. कापसाचे ग्रेडिंग किंवा वजन काटा करताना, कापसाचा दर्जा खराब असल्याचे सांगून, कापसाच्या वजनात घट करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांनी दिले.
तालुकास्तरीय कापूस खरेदी समित्या गठित!
जिल्ह्यात हमी दराने कापूस खरेदीची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी पणन संचालकांच्या आदेशनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय तीन सदस्यीय कापूस खरेदी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक (सहकारी संस्था ) तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असून, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव समितीचे सदस्य-सचिव आहेत, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधकांनी या बैठकीत दिली.