चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:19+5:302021-02-10T04:18:19+5:30
अकोला : पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू झाल्याने शाळेत किलबिलाट वाढला आहे. दिवसेंदिवस शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. ...
अकोला : पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू झाल्याने शाळेत किलबिलाट वाढला आहे. दिवसेंदिवस शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. दुसरीकडे, शाळेत जाताना विद्यार्थी पालकांना चॉकलेटऐवजी मास्क, सॅनिटायझरची मागणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विद्यार्थी पालकांकडे मास्क व सॅनिटायझरसाठी हट्ट करीत असल्यामुळे मास्क व सॅनिटायझरची विक्री वाढली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. सध्या शाळा पूर्ववत सुरू झाल्याने मुले दररोज नवीन पेन, पेन्सिल, वही, कंपास यासारख्या शैक्षणिक साहित्यासह चॉकलेट, बिस्कीटची मागणी पालकांकडे करतात. मुलांकडून होणाऱ्या विविध वस्तूंच्या या हट्टामध्ये आता काहीसा बदल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुले शाळेत जाण्यापूर्वी पालकांकडे आता नवीन मास्क, सॅनिटायझरची बॉटल मागत आहेत. मित्राने जसे रंगीत, डिझाइनचे मास्क आणले, मलाही तसेच मास्क हवेत, यासाठी मुले हट्ट धरत असल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या या हट्टामुळे मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती मेडिकलचालकांनी दिली.
------------------------------------
रंगीबेरंगी मास्कला पसंती
शाळेत गेल्यानंतर आपला मास्क सर्वांत चांगला दिसावा, यासाठी विद्यार्थ्यांमधून रंगीबेरंगी मास्कला पसंती वाढली आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे व डिझाइनचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
-----------------------------
शाळा सुरू झाल्यापासून गत आठवडाभरामध्ये मास्क आणि सॅनिटायझरची विक्री वाढली आहे. काही मुले दर दोन दिवसांना नवीन मास्क, सॅनिटायझर खरेदीसाठी येतात.
-मेडिकलचालक
-----------------------
शाळेत जाताना मुले चाॅकलेट किंवा नवीन पेन, पेन्सिल आदींची मागणी करीत होते. मात्र, आता वेगवेगळ्या मास्क आणि सॅनिटायझरसाठी हट्ट पुरवावे लागत आहेत.
-राजेश कोरडे, पालक