कोरोना चाचणी नसेल, तर पेट्रोल पंप, बँकेत ‘नो एन्ट्री’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:33+5:302021-05-29T04:15:33+5:30
अकोट : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पेट्रोल पंप व बँकेत व्यवहार करण्यासाठी कोरोना चाचणी केल्याचा अहवाल ...
अकोट : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पेट्रोल पंप व बँकेत व्यवहार करण्यासाठी कोरोना चाचणी केल्याचा अहवाल नसल्यास प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश अकोट तहसीलदार नीलेश मडके यांनी काढला आहे.
कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा स्थितीत बँकेत व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना सूट देण्यात आली आहे. तसेच पेट्रोल पंपावरसुद्धा पेट्रोल व डिझेल खरेदी अत्यावश्यक सेवेसाठी शिथिलता देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पेट्रोल पंप व बँकांना आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार ग्राहकांकडे कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय पेट्रोल, डिझेल देण्यात येऊ नये, तसेच बँकेतसुद्धा कोणतेही व्यवहार करण्यात येऊ नये, असे नमूद केले आहे. दरम्यान सर्व पेट्रोल पंप, बँका, मोठ्या आस्थापना येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.
--------------------
कोरोना चाचणीसाठी विशेष कॅम्प
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना राबविल्या जात आहे. नागरिकांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार, शहरात विशेष कॅम्प शहरात आयोजित करण्यात आले आहेत. शहरातील दगडी शाळा, सोनू चौक, जीम सहकारी मुख्य शाखा परिसर, ग्रामीण रुग्णालय, अकोट येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.