विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने ओलांडली नाही सरासरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 11:04 AM2021-09-02T11:04:03+5:302021-09-02T11:04:09+5:30
Rainfall News : जून ते ऑगस्टदरम्यान विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही.
अकोला : यंदाच्या मान्सूनमध्ये पाऊसमान चांगले राहिले आहे; मात्र अतिवृष्टी व वेळोवेळी पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसानही झाले. जून ते ऑगस्टदरम्यान विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही. तर चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचे ‘आयएमडी’कडून मिळालेल्या माहितीवरून दिसून येते. विदर्भात यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला. बहुतांश जिल्ह्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यंदातरी चांगला पाऊस बरसेल अशी अपेक्षा होती; परंतु सुरुवातीला पाऊस बरसल्यानंतर तब्बल २०-२२ दिवसांचा खंड पडला. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला. आताही काही दिवसांच्या अंतराने पाऊस होत आहे. कमी-जास्त प्रमाणात बरसणाऱ्या पावसामुळे विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही. तर बुलडाणा, अमरावती, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद झाली.
मागील तीन महिन्यांत विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. हे अनियमित पावसाचे वर्ष राहिले आहे. काही जिल्ह्यांत कमतरता जास्त दिसून येत आहे.
- संजय अप्तूरकर, हवामान अभ्यासक
सात जिल्ह्यांत सरासरी पाऊस
विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा व चंद्रपूर या ७ जिल्ह्यांत सरासरी पावसाची नोंद झाल्याचे आयएमडीकडून नोंदविण्यात आले आहे. तर सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात ८४२.७ मिमी पाऊस झाला आहे.