ना उष्माघात कक्ष, ना सुविधा!
By admin | Published: April 4, 2017 01:26 AM2017-04-04T01:26:11+5:302017-04-04T01:26:11+5:30
ग्रामीण रुग्णालये वाऱ्यावर : अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा आणि बाळापुरातील प्रकार
अकोला : उन्हाचा पारा गेल्या आठवड्यापासून चढलेला आहे. देशभरातील उष्ण शहरांमध्ये अकोला शहरासह जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व सोयी-सुविधायुक्त उष्माघात कक्ष निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील तीन ग्रामीण व एका उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तर दूरच, सोयी-सुविधांचीही वानवा असल्याचे चित्र ‘लोकमत’ने ३ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आले आहे.
तेल्हारा येथे जनरेटर, कूलर या मूलभूत गोष्टींसह औषधीही नसल्याचे आढळले. अकोट येथील जनरेटर काही दिवसांपासून बंद आहे. तेथेही उष्माघाताचा कक्षच उघडण्यात आला नाही. मूर्तिजापूरला उपजिल्हा सामान्य रुग्णालय असतानाही तेथेही कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही. रुग्णांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. बाळापुरात रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसून, एवढेच नव्हे, तर ग्लासही नसल्याचे चित्र आहे.
अकोटात उष्माघात कक्षच नाही!
अकोट ग्रामीण रुग्णालयात ३ एप्रिल रोजी ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या रुग्णालयात उष्माघात झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उष्माघात कक्षच सुरू केला नसल्याची बाब उघडकीस आली.
या ठिकाणी उष्माघात कक्ष आहे की नाही, ही माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी नोंदणी विभागात १० रुपयाची पावती फाडून रुग्णाच्या नावाची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या कक्षात एका महिला डॉक्टरला रुग्णाची माहिती देण्यात आली.
मूर्तिजापूरात पाणी नाही, कूलर शोभेचे!
सध्या जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. अशा तापमानामुळे नागरिकांना उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. अशा स्थितीत सामान्यत: सरकारी रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष निर्माण केले जातात; परंतु येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात अद्यापपर्यंत उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षच निर्माण करण्यात आलेला नाही. मूर्तिजापूरमधील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात स्टिंग करण्यात आले. रुग्ण म्हणून नाजूक खंडारे व नातेवाईक म्हणून अतुल नवघरे यांना पाठविण्यात आले असता तेथील अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे व कैलास अग्रवाल रुग्णालयात दान देण्यासाठी आणलेल्या वॉटर कूलरची पाहणी करीत होते.
बाळापूरात तपासणीविना औषधे लिहून दिली!
बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष नसल्याने उन्हाचा तडाखा बसलेल्या रुग्णांना औषधी देऊन आल्या पावली परत पाठवले जाते. रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभाग उदासीन असल्याने तालुक्यात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. या ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्षच निर्माण करण्यात आला नाही. उन्हाचा तडाखा बसलेल्या अंदुरा येथील उमाळे या रुग्णाची कोणतीही तपासणी न करताच दवाखान्यातून देण्यात येणाऱ्या चिठ्ठीवर डॉक्टरांनी औषधी लिहून दिली. रुग्णांनी औषधी कशी घ्यावी, तेदेखील सांगितले नाही. डॉक्टर त्यांच्या कक्षात न बसता औषधी कक्षात बसून होते.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कार्यालय बंद दिसून आले.
तेल्हाऱ्यात औषधांचा तुटवडा!
येथील ग्रामीण रुग्णालयाला ३ एप्रिल रोजी भेट दिली असता उष्माघात कक्ष सुरूच करण्यात आला नसल्याचे आढळले. एवढेच नव्हे, तर रुग्णांना कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र होते. उष्माघाताचे औषधच ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून समोर आला.