केवायसी केलेली नाही, मॅसेजला दिला रिप्लाय अन् सायबर चाेरट्यांनी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील दीड लाख उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:46+5:302021-09-14T04:23:46+5:30
गीता नगरातील रहिवासी अमित उमेश अग्रवाल यांचे तेल्हारा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या याच ...
गीता नगरातील रहिवासी अमित उमेश अग्रवाल यांचे तेल्हारा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या याच खात्याला नेटबँकिंग सुविधा करून ते या माध्यमातून सर्व व्यवहार ऑनलाइन करतात़ अमित अग्रवाल यांच्या मोबाइलवर २९ ऑगस्ट राेजी एक मॅसेज आला. या मेसेजनुसार त्यांनी केवायसी केली नसून दस्तावेज पडताळणी न केल्यास मोबाइल नंबर २४ तासामध्ये ब्लाॅक करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आली. त्यांनी सुरुवातीला या मॅसेजकडे दुर्लक्ष केले, मात्र काही वेळानंतर पुन्हा तोच मॅसेज आला. त्यानंतर अग्रवाल यांनी आलेल्या मॅसेजला रिप्लाय दिला असता समाेरील व्यक्तीने त्यांना फाेन करीत तुमचा माेबाइल नंबर केवायसी केलेला नसल्याचे सांगितले. यावर अग्रवाल यांनी केवायसी करायची पद्धत विचारली असता समोरील व्यक्तीने सर्व प्रक्रिया सांगितली़ त्यानुसार अग्रवाल यांनी प्रक्रिया केली असता त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा मॅसेज आला़ त्यानंतर अकाऊंट बंद करण्यासाठी अग्रवाल यांनी लगेच एसबीआय बँकेत फोन केला. मात्र काही क्षणातच सायबर चाेरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील आणखी ५० हजार व त्यानंतर तीसऱ्यांदा ५० हजार रुपये असा एकून दीड लाख रुपयांचा विड्राॅल केला़ हे तीनही मेसेज अग्रवाल यांना काही क्षणातच धडकले़ त्यामुळे अग्रवाल यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले, मात्र त्यांनी काहीही करायच्या आधीच चाेरट्यांनी त्यांचे बँक खाते साफ केले़ त्यानंतर अमित अग्रवाल यांनी या प्रकरणाची तक्रार पाेलीस ठाण्यात दिली असून पाेलिसांनी कलम ६६(सी)(डी) आय.टी. ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास आता सायबर पोलीस करीत आहेत.