‘नो मास्क-नो पेट्रोल’ला पंपचालकांकडून हरताळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:52+5:302021-03-09T04:21:52+5:30
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शहरातील आणि लगतच्या भागातील पेट्रोलपंप चालकांनी ‘नो मास्क - नो पेट्रोल’चे ...
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शहरातील आणि लगतच्या भागातील पेट्रोलपंप चालकांनी ‘नो मास्क - नो पेट्रोल’चे फलक पंपावर लावले. मात्र, प्रत्यक्षात या नियमाच्या अंमलबजावणीकडेच दुर्लक्ष होत असल्याने पेट्रोलपंप परिसर कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्व व्यावसायिकांनी त्यांना ठरवून दिलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. तसे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील देण्यात आला होता; मात्र कारवाई थंडावली आहे.
आठवड्यात उष्णतामान वाढणार!
उन्हाळ्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशांच्या जवळपास जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यातच अकोला शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
शहरातील सोमवारचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर वातावरणात चांगलाच उकाडा होता. शहरातील आर्द्रतेमध्येही मोठ्या प्रमाणावर घट नोंदविण्यात आली. सकाळी आर्द्रता ३६ टक्के होती. ती सायंकाळी घटून १६ टक्क्यांवर आली. त्यामुळे सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता. विदर्भात चंद्रपूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूरचे तापमान ३७ अंशांवर राहिले.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ६ ते १० मार्च दरम्यान आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. हवामान कोरडे, कमाल तापमान ३८ ते ३८.८ अंश सेल्सिअस, किमान तापमान १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अकोल्यात मंगळवार आणि बुधवार ४० अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
तापमानात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, जनावरांना हिरवा चारा, पिण्यास थंड व स्वच्छ पाणी द्यावे तसेच सावलीच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालेभाज्या, भेंडी, गवार, चवळी, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी आणि कोथिंबीर पिकास जमिनीतील ओलावा बघून आवश्यकतेनुसार ओलीत करावे. परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असेही सुचविण्यात आले आहे.