ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; वाहक मास्क घालून तर चालक विनामास्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:30+5:302021-06-24T04:14:30+5:30
राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांच्या उपचारावर लाखो रुपये ...
राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांच्या उपचारावर लाखो रुपये खर्च करावे लागले, तर अनेक जण अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आले. आता ही लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. यासाठी जनतेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एसटीच्या प्रवासात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रत्यक्षात अनेक प्रवासी मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची दक्षता घेत नसल्याचे, तसेच चालक, वाहकही विनामास्क कर्तव्य बजावत असल्याचे अनेक बसमध्ये दिसून येत आहे. याबाबत अकोला - दिग्रस बसमध्ये पडताळणी केली असता चालक विनामास्क होते, तर वाहकाने मास्क घातला असल्याचे आढळून आले.
प्रवासादरम्यान चालकाच्या तोंडावर मास्कच नाही!
चालक
अकोला - दिग्रस या बसच्या चालकाने अकोला - बार्शीटाकळी या अर्ध्या तासाच्या प्रवासात एकदाही मास्क लावला नाही, तसेच केबिनमध्ये त्याच्या शेजारी एक प्रवासी विनामास्क बसला होता.
वाहक
एसटीच्या प्रवासात कोरोना संसर्गाची सर्वाधिक खबरदारी बाळगण्याचे काम वाहकाला करावे लागते. या प्रवासात बसमध्ये चढताना चालकाचा मास्क नाकाखाली होता व तिकीट काढताना पूर्ण मास्क घातला होता.
कुठल्या बसथांब्यावर किती चढले-उतरले!
अकोला
सकाळी १०.३० वाजता येथील आगार क्रमांक २ मधून दिग्रसकरिता एसटी बस सुटल्यानंतर या बसमध्ये २९ प्रवासी बसले होते. दरम्यान, एसटी वर्कशॉपजवळ एक प्रवासी बसला, तर पुढे कौलखेड चौकात आणखी दोन प्रवासी बसले. बस थोड्या अंतरावर जात नाही तोच आणखी एक प्रवासी बसमध्ये बसला.
बार्शीटाकळी
सव्वा अकराच्या दरम्यान ही बस बार्शीटाकळी येथे पोहोचली. यावेळी आठ प्रवासी उतरले. काही प्रवासी चढले. या प्रवासात निम्म्यापेक्षा अधिक प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाहीत. एक प्रवासी तर चक्क चालकाच्या बाजूला विनामास्क बसला होता.
‘लोकमत’चा एसटी प्रवास
बस
अकोला-दिग्रस
वेळ
सकाळी १०.३०
प्रवासी
३३