दिलासादायक! अकोल्यात कोरोनाचा कोरोना नवा रुग्ण नाही; तिघांना डिस्चार्ज
By प्रवीण खेते | Published: April 8, 2023 05:41 PM2023-04-08T17:41:41+5:302023-04-08T17:42:58+5:30
शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला.
अकोला: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, शनिवारी एकही नवा रुग्ण आढळला नसल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, तिघांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, सक्रीय रुग्णांची संख्या घसरून ३८ वर आली आहे. जिल्ह्यातील एचानक बदललेल्या वातावरणामुळे व्हायरलच्या तापेने डोकेदुखी वाढविली आहे.
अशातच कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचीही शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. मात्र, शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे ३८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी सहा रुग्णालयात दाखल असून उर्वरीत ३२ रुग्ण गृहविलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज
कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, बहुतांश लोक चाचणी करण्यास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोविडच्या फैलावाची शक्यताही आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आरोग्य यंत्रणेला चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. त्या दृष्टिकोनातून चाचण्या वाढविण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.