लस घेवूनही कुणाची ऑनलाइन नोंद नाही, तर कुणाला दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 10:58 AM2021-08-28T10:58:32+5:302021-08-28T10:58:39+5:30
Corona Vaccine : कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून काही लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदच झाली नाही, तर काहींची चुकीची माहिती समाविष्ट करण्यात आली.
- प्रवीण खेते
अकोला : काेविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढली होती. ऑनलाइन नोंदणी होत नाही, म्हणून अनेकांनी कूपनद्वारेच लसीचा पहिला डोस घेतला होता, मात्र कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून काही लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदच झाली नाही, तर काहींची चुकीची माहिती समाविष्ट करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या या चुकांमुळे लस घेतलेल्या नागरिकांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरण प्रमाणपत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कुठेही प्रवेश मिळविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे, मात्र जिल्ह्यातील काही नागरिकांनी लस घेऊनही त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काहींनी कूपन पद्धतीने लसीचा डोस घेतला, मात्र लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून लस घेणाऱ्याची योग्य माहिती ऑनलाइन समाविष्ट न झाल्याने लसीकरण प्रमाणपत्रावर त्रुटी दिसून येत आहेत. तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे पहिला डोस घेऊनही काहींना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले नाही, तर कुणाला दोन्ही डोस घेऊनही पहिला डाेस घेतल्याचेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. काहींच्या प्रमाणपत्रात नाव चुकीचे, तर काहींच्या प्रमाणपत्रात लिंग चुकीचे, अशा चुकांमुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
लस घेऊनही ऑनलाइन नोंद दाखवत नसेल तर येथे भेट द्या.
ज्यांनी कूपन पद्धतीद्वारे लस घेतली आहे, मात्र त्यांची ऑनलाइन नोंद झाली नाही, अशा नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
त्यासाठी नागरिकांनी मुख्य डाकघराजवळील मनपाच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात भेट द्यावी.
ऑनलाइन नोंदणीसाठी लस घेतल्याची पावती सोबत न्यावी.
कुणाचे नाव चुकीचे, तर कुणाचे लिंग
लसीकरण प्रमाणपत्रामध्ये अनेकांचे नाव चुकीचे असल्याचे दिसून येते, मात्र काहींच्या बाबतीत वेगळाच प्रकार समोर आला आहे. महिलांच्या प्रमाणपत्रावर पुरुष असल्याचे दाखविण्यात आले. काहींनी दुसरा डोस घेऊनही त्यांना पहिला डोस घेतल्याचेच प्रमाणपत्र पुन्हा आले. प्रामुख्याने या चुका प्रमाणपत्रावर दिसून येत आहेत.
तुम्ही स्वत: करू शकता चूक दुरुस्त
सर्वप्रथम गुगलवर कोविन पार्टलवर जा.
त्यामध्ये तुमचे लॉग इन करा.
त्यानंतर ‘राईन ॲन इशू’वर जाऊन क्लिक करा.
त्यानंतर तृटी दुरुस्त करा.
ही चूक एकदाच दुरुस्त करू शकता.
नागरिक स्वत:च प्रमाणपत्रावरील चुका दुरुस्त करू शकतात. तशी सुविधा कोविन पाेर्टलवर देण्यात आली आहे. ज्यांनी कूपनद्वारे लस घेतली, मात्र ऑनलाइन नोंद दाखवत नसेल, अशा नागरिकांनी मुख्य डाकघर परिसरातील मनपा आरोग्य विभागाच्या कार्यालयात भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करुन घ्यावी.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला